Ed Raid : ईडीच्या आठ ठिकाणी धाडी, युनियन बँक घोटाळ्यात यांच्या अडचणी वाढणार…
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ कारवाई सुरू केली आहे. दिल्ली ईडीचे सुमारे वीस अधिकारी आज पहाटे मुंबईत दाखल झाले. दिल्लीतून आलेल्या या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि मुंबईच्या अनेक भागात सकाळपासून धाडसत्र सुरू केले.
मुंबई : सकाळपासून ईडीच्या आठ ठिकाणी धाडी पडल्या आहेत. युनियन बँकेत 153 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, त्याचप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ईडीने हे धाडसत्र सुरू केले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे, त्यामुळे यात अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सीबीआयच्या दिल्ली युनिट ने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर आता दिल्ली ईडीने आपला मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ कारवाई
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ कारवाई सुरू केली आहे. दिल्ली ईडीचे सुमारे वीस अधिकारी आज पहाटे मुंबईत दाखल झाले. दिल्लीतून आलेल्या या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या आणि मुंबईच्या अनेक भागात सकाळपासून धाडसत्र सुरू केले. आठ टीम बनवून या अधिकाऱ्यांनी आठ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात अनेक बाबींचा उलगडा झाला असून काही महत्वाची माहितीही ईडीच्या हाती लागली आहे. या धाडसत्रात ईडीने काही गोष्टी जप्तही केल्या आहेत.
ईडीने तीन जणांना ताब्यात घेतले
या धाडीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत, त्याचप्रमाणे तीन जणांना ताब्यात घेऊन ईडी कार्यलयात आणण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. युनियन बँकेची सुमारे 135 कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्याशी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा संबंध असल्याचेही बोलले जात आहे. या नेत्याशी संबंधित तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याचं ईडीच्या सूत्रांचे म्हणणं आहे. मात्र हा नेता कोण आहे? ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र ईडी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.