दोन राजकीय विरोधकांना एकत्र आणणार… मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितला फॉर्मूला
gulabrao patil: शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे दोघे एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्या भागाच्या विकासासाठी एकत्र असतात. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्र असावे.
राजकारणातील विरोधक कधीही नेहमी विरोधक नसतात. आज मित्र असलेले उद्या विरोधक होतात अन् विरोधक असलेले मित्र होतात. राज्यातील राजकारणात कधीकाळी एकाच पक्षात असलेले भाजप नेते अन् मंत्री गिरीश महाजन अन् आमदार एकनाथ खडसे मित्र होते. त्यानंतर भाजपमध्येच असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला. एकमेकांवर टीका करताना या दोन्ही नेत्यांनी अगदी खालची पातळी गाठली होती. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून पुन्हा भाजपकडे येणार आहे. परंतु त्यांचा प्रवेश सोहळा अनेक महिन्यांपासून थांबला आहे. हे दोन्ही नेते एकत्र येतील. त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पार पाडतील, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील
एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांनी एकत्र यावे. आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे व गिरीश महाजन त्यांना एकत्र आणणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. रक्षा खडसे जर या दोघांना एकत्र आणत असतील तर त्यांना आमची सुद्धा सदिच्छा आहे. तेच नाही जळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षातील इतर लोकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र राहावे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यासाठी सर्वच पक्षाने एकत्र असावे
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे दोघे एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांच्या भागाच्या विकासासाठी एकत्र असतात. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असेल तेव्हा एकत्र असावे. ही माझीस नाही तर जनतेची सुद्धा अपेक्षा असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यामांशी बोलताना म्हटले आहे.
महाजन अन् खडसे वाद जुना
जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांचा वाद जुना आहे. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर हा वाद वाढला होता. दोन्ही नेते वैयक्तीक आरोप-प्रत्यारोप करत होते. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडले अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्याचवेळी एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपात होती.