‘उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल’, मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आपल्यासोबत येतील, असा विरोधातील इंडिया आघाडीचा दावा होता. पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी आपण एनडीएसोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला. नितीश कुमार यांनी शपथविधीचा कार्यक्रम लवकर पार पाडावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर अखेर मोदी 3.0 सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘X’ वर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?
“बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! गेले दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदी जी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवा भारत, श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नात आम्ही भक्कम साथ देणार आहोत”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!
गेले दहा वर्षे व्रतस्थपणे देशाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटणारे, जागतिक पातळीवर भारताला मोठा सन्मान मिळवून देणारे आणि अहोरात्र गरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेले भारताचे भाग्यविधाते, विश्वगुरू नरेंद्र मोदी जी यांनी आज तिसऱ्यांदा…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2024
“भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी नेण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न आता पूर्ण होईल, ही खात्री आहे. गरिबांना, वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, असा विश्वास मला वाटतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.