आताची सर्वात मोठी बातमी; उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का, दिल्लीत घडामोडींना वेग
शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत नेत्यांचे प्रवेश सुरूच आहेत. एकनाथ शिंदे हे आता आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना देण्याच्या तयारीमध्ये आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार दणका दिला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागनम केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासचाच आकडा गाठता आला, दरम्यान या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पुण्यातील काही नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील या देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमलता पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे की, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकांना काम करायचं आहे, एकनाथ शिंदे मुंबईमध्ये असताना कामात बिझी असतात, म्हणून अनेक लोक दिल्लीत आले आहेत. त्यामुळं दिल्लीत हे पक्षप्रवेश होत आहेत, असं मस्के यांनी म्हटलं आहे.