चांगली खाती न मिळाल्यास शिंदेंची पॉवर घटणार?, पक्षाला सांभाळण्याची मोठी कसोटी
अनेक दिवस रुसूनही भाजपाचे पक्षश्रेष्टी ढीम्म राहिल्याने एकनाथ शिंदे असो कि अजितदादा पवार या दोघांनाही आता जे मिळतेय त्यातच समाधान मानून सत्तेच्या उबेजवळ राहतोय हेच महत्वाचे असणार आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी नवीन सरकारचा शपथविधी होत आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचे नव्या सरकारमध्ये अवमूल्यन झाले आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद भूषविल्यानंतर आता दुय्यम पद भूषवणे शिंदे यांना जड जाणार आहे.त्यांना जर मलाईदार खाती मिळाली नाही तर त्यांचे राजकीय करीयर अडचणीत येणार आहे. कारण सत्तेच्या शक्तीने त्यांनी ठाकरे यांना धडक दिली होती. आता सत्तेत नमती बाजू घ्यावी लागल्यास शिंदे यांना पक्षावर पकड राखणे कठीण होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळणार याची खात्री झाल्यानंतर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते आमची इच्छा आहे एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये काम करावे. आम्हाला आशा आहे ते सकारात्मक निर्णय घेतील.त्यानंतर रात्री उशीरा देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांत सरकारमध्ये पॉवर शेअरिंगवर चर्चा देखील झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहे.अजितदादा पवार यांना यांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रालय मिळणे निश्चित झाले आहे. परंतू शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्रालय मिळणार का ? याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
शिंदे यांची कसोटी लागणार
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 57 जागा जिंकून उद्धव ठाकरे यांना चपराक देत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वारसा आपल्याकडे असल्याचे सिद्ध केले आहे.अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची झुल पांघरल्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री पदावर येणे म्हणजे डिमोशन मानले जात आहे. तर सत्ता शेअरिंग मध्ये पॉवर फूल मंत्रालये मिळाली तरच शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल. अशात त्यांच्या समोर शिवसेनेच्या आमदारांना सोबत एकत्र ठेवण्याचे मोठे चॅलेंज असणार आहे. शिवसेनेचा विस्तार करण्यावर देखील मर्यादा येणार आहेत.
निधी मिळवताना मारामार होणार
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून सोडून जाताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजितदादा शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत त्यामुळे विकासकामे होत नाहीत अशी तक्रार केली होती. आता देखील महायुतीत सर्वाधिक 132 ताकद भाजपाकडे आहे. त्यात अजितदादांना अर्थमंत्री केले तर मतदार संघात निधी मिळविताना मारामार होणार आहे.
शिंदे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री पदासोबत 12 ते 13 मंत्री पदे मिळण्याची आशा आहे. महाराष्ट्रातील सत्तेतील भागीदारीच्या ताकदीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत पक्षाची ताकद वाढविणे शक्य होणार आहे. एकनाथ शिंदे यांना आणखी काही काळ मुख्यमंत्री पद दिले असते तर पार्टीचे मनोधैर्य वाढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत चांगले यश मिळाले असते. शिंदे यांच्या कोट्यातून अडीच वर्षे कॅबिनेटचा भाग असलेले सर्व मंत्री निवडून आले आहेत. त्यामुळे ते आपली खाती कायम ठेवण्यासाठी आतूर आहेत, तर काही नवीन चेहऱ्यांनाही मंत्री बनायचे आहे.शिंदे यांच्या सोबत शिवसेना फूटीनंतर 38 आमदार सोबत आहे होते. त्यातील दहा मंत्री होते. यंदा तर 57 आमदार निवडून आले आहेत.तसेच चार अपक्षांना पाठींबा देखील आहे.त्यामुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे. परंतू मंत्रीपदांच्या वाटपात कसोटी लागणार आहे.
नव्या – जुन्यांना संधी देण्याची कसोटी
मुख्यमंत्री पदावरुन आता उपमुख्यमंत्री पदावर येताना एकनाथ शिंदे यांना पक्षात संतुलन ठेवावे लागणार आहे. स्थानिक आणि जातीय समीकरण देखील पाहावे लागणार आहे.कारण 12 ते 13 मंत्री पदे कोणत्या जागी आणि कोणाला देणार ही अवघड जबाबदारी आहे. भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदारांना गेल्यावेळी काही मिळाले नव्हते. तर जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाही तर ते देखील नाराज होणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या कमजोरीचा फायदा उद्धव ठाकरे उठवू शकतात. अशा प्रकार शिंदे यांच्यासाठी पुढील काळ कसोटीचा आहे.