धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी, तर सांगली-मिरज-कुपवाडासाठी 18 जानेवारीला मतदान
काही महापालिकेत पोटनिवडणुकाही होणार आहेत. धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाडाचाही समावेश आहे.
राज्यात सर्वत्र सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 32 जिल्ह्यातल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. यासोबत काही महापालिकेत पोटनिवडणुकाही होणार आहेत. धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाडाचाही समावेश आहे. या महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
या तारखेला होणार मतदान
चार महानगरपालिकांतील चार जागांच्या पोटनिवडणुकांपैकी केवळ सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. तेथे आता 18 जानेवारी 2022 रोजी मतदान आणि 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणी होईल. धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा या तीन महानगरपालिकांमधील प्रत्येका एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर, 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकांच्या तारखाही स्पष्ट झाल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागणार आहेत.
खुल्या प्रवर्गात टाकलेल्या ओबीसी जागांसाठी 18 जानेवारीला मतदान
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे मात्र निवडणुक आयोगाने वेळापत्रकात एवढाच बदल केला आहे. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
सर्वच राजकीय पक्ष जोमाने रिंगणात
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुका आणखी रंगतदार होणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा पेच असल्यामुळे काही ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचीही शक्यता आहे. तर बहिष्कार टाकण्याऐवजी भाजपला मतदान करू नका असे आवाहन भुजबळांनी केल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.