शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराची होणार ओळखपरेड, दिल्लीत मोठ्या घडामोडी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांची ओळखपरेड होणार आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात 12 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर असतील.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक आमदार आणि खासदाराची ओळखपरेड करुन निवडणूक आयोग चिन्हा संदर्भात निर्णय घेईल.
शिंदे गटाकडून पुढच्या आठवड्यात लवकरच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात दिल्लीमध्ये धनुष्यबाण कुणाचं? यावर फैसला होणार आहे.
सुप्रीम कोर्टातही होणार सुनावणी
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ सुप्रीम कोर्टातही महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
संबंधित प्रकरण कोर्टाकडून लिस्ट करण्यात आलंय. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे याबाबत सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची? व्हीप कोणाचा लागू होणार? विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय? 16 अपात्र आमदार या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.