प्रत्येक महिलेकडे ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात… सोशल मीडियावर महत्त्वाची माहिती व्हायरल
सोशल मीडियावर महिलांना जागृत करणारा एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत महिलांना संकट काळात कुणाला फोन लावू शकतात, अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
स्त्री ही आदिशक्ती असते. स्त्रीच्या शिवाय संपूर्ण जग अपूर्ण आहे. प्रत्येक घरात आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा वेगवेगळ्या रूपात स्त्री आहे म्हणून त्या घराला घरपण आहे. आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी, मुलगी यांची मदत होते. आपलं आयुष्य या महिलांवरच अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येक घरातील महिला आणि मुलीचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. असं असलं तरीही देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूरमध्ये एका महिला आणि मुलीची नग्न धिंड काढण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. यानंतर सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका नामांकित रुग्णालयात डॉक्टर तरूणीवर पाशवी अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. यानंतर बदलापुरात एका नामांकित शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला बघयला मिळाला. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आता सर्वसामान्य नागरीक हे आक्रमक होताना दिसत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर नागरिकांना बदलापूर रेल्वे स्टेशनवर येत रेल्वे सेवा बंद केली होती. तर रत्नागिरीत काल एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना झाल्यानंतर नागरीक रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले. त्यावेळी नागरिकांनी थेट पोलिसांनाच जाब विचारलेलं बघायला मिळालं.
महिला अत्याचाराच्या घटनांवर आता नागरीक देखील सजग आणि सतर्क होत आहेत. महिलांचा अत्याचार करणाऱ्या नराधमांना जबर बसावी यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जातेय. तसेच पोलीस यंत्रणांकडूनही संकटात असलेल्या महिलांसाठी काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. पण त्यांची माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे नागरीक आता स्वत:हून तसे हेल्पलाईन नंबर शेअर करत आहेत. सोशल मीडियावर महिलांना जागृत करणारा एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत महिलांना संकट काळात कुणाला फोन लावू शकतात, अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
व्हायरल होणाऱ्या कात्रणमध्ये काय?
“देशातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी त्यांना प्रत्येक परिस्थितीत सर्व प्रकारची कायदेशीर मदत दिली जाते. राज्य आणि केंद्र सरकारनेही महिलांसाठी हेल्पलाइन सुरु केल्या आहेत. संकटग्रस्त महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक 1091 सर्व राज्यांमध्ये 24 तास कार्यरत असतो”, अशी माहिती संबंधित कात्रणमध्ये देण्यात आली आहे.
कात्रणातील माहितीनुसार, महिलांकडे ‘हे’ हेल्पलाईन नंबर असायलाच हवेत
- संकटात त्वरित मदत मिळावी यासाठी – 1091, 1090 नंबरवर फोन करावा
- घरगुती हिंसा – 181 नंबरवर फोन करावा
- पोलीस मदत हवी असेल तर – 100, 112 क्रमांकावर फोन करावा.
- महिला रेल्वे सुरक्षेसाठी 182 क्रमांकावर फोन करावा.
- चाइल्ड हेल्पलाइन – 1098 क्रमांकावर फोन करावा.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे मदत मिळावी यासाठी 14433 या क्रमांकावर फोन करावा.
- राष्ट्रीय महिला आयोगात तक्रारीसाठी 91-11-26944880, 91-11-26944883