“मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, कितीही ऑफर असल्या तरी…” माजी खासदाराचे थेट वक्तव्य
विविध पक्षातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे या निवडणुकांसाठी उभं राहायची संधी मिळावी यासाठी लॉबिंग करत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी खासदाराने महापालिका निवडणुकांबद्दल मोठे विधान केले आहे.

राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांना महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. विविध पक्षातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते हे या निवडणुकांसाठी उभं राहायची संधी मिळावी यासाठी लॉबिंग करत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या एका माजी खासदाराने महापालिका निवडणुकांबद्दल मोठे विधान केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘एकला चलो रे’ चा नारा दिला होता. “सर्वांचं मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात. ठिक आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन”, असे उद्धव ठाकरे अंधेरीतील सभेदरम्यान म्हणाले होते. त्यानतंर आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आम्ही स्वबळावरच निवडणुका लढवणार असा पुनरुच्चार केला आहे.
महायुतीमध्येच खूप भांडण
“न्यायालयाने 25 फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यानंतर निकाल लागला तर आदेश निघेल. त्यानंतर दोन महिने विभाग रचना आणि इतर प्रक्रियेत जातील. म्हणजे तेव्हा पावसाळा सुरू होतो आणि त्यादरम्यान निवडणुका होत नाही. त्यामुळे हे सगळं असं चालू आहे. या सरकारला असं वाटत आहे की निवडणुका घेऊ नये. त्यांच्यातच महायुतीमध्येच खूप भांडण चालू आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकांमध्ये कुणाचा वर्चस्व असेल अशी स्पर्धा आता त्यांच्यामध्ये सुरू आहे”, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
मला भविष्यात ऑफर येऊच शकत नाही
त्यांच्या स्पर्धेच्या निमित्ताने हे वाढत गेलं. कार्यकर्ते इतके उत्सुक झाले होते. अनेकांनी पालिका निवडणुकांची तयारी केली होती. मात्र असं झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पाच वर्षापासून काहीच नाही. फक्त अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे. त्यामुळे हे योग्य नाही. या सरकारला पहिल्यापासून निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. अशी खात्री पूर्णपणे लोकांना पटलेली आहे. कोणीही कार्यकर्ते आता तिकडे जाणार नाहीत. अनेकांनी जरी मला ऑफर केल्या असल्या तरी मी कडवट शिवसैनिक आहे. आता मला भविष्यात ऑफर येऊच शकत नाही. कारण मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
महापालिकेची आमची तयारी सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकांच्या निवडणुका आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढू. महापालिका निवडणुका लढण्याची आमची तयारी स्वबळावरच आहे, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले.
जखमी झालेल्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी
“माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये 17 भाविकांचा मृत्यू झालेला आहे. त्या ठिकाणी व्यवस्था मात्र थोडीफार कोलमडलेली आहे. तिथे योगी जी आहेत त्यांनी आणि मी जवळपास 20 वर्षे सोबत काम केले आहे. त्यामुळे इतके लोक त्या ठिकाणी आल्यामुळे काहीतरी घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मी अजूनही योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्या ठिकाणची व्यवस्था चांगली करावी. कारण अजून 15 ते 20 दिवस कुंभ आहे. जे भाविक जखमी पडलेले आहेत त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी आणि पुढे अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे”, असेही चंद्रकांत खैरेंनी म्हटले.