आधी सोडचिट्ठी, आता चिठ्ठी, नीलम गोऱ्हे यांच्या ‘त्या’ चिठ्ठीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय?
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर एका वर्षाने नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.
मुंबई । 19 जुलै 2023 : उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी ते दौरे करत नसले, तरी काही ठिकाणी मी गेले होते. राज्यात झालेल्या सत्तापालट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नीतीधैर्य खचत चालले. रोज सकाळी होणारा वादविवाद याला कारण आहे अशी टीका त्यांनी केली होती. नीलम गोऱ्हे यांनी पक्ष बदल केल्यानंतर आज विधानपरिषद सभागृहात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. सभागृहात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात काही वेळ बसले. शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन ते सभागृहात हजर झाले.
दुपारी एक वाजून पाच मिनीटांनी ते सभागृहात आले. उद्धव ठाकरे सभागृहात आले तेव्हा लक्षवेधी सुचना सुरु होती. पीठासन अधिकारी उपसभापती नीलम गोऱ्हे त्यावेळी कामकाज पत्रिका पहात होत्या. त्यामुळे त्यांचे लक्ष नव्हते. उद्धव ठाकरे आपल्या आसनावर बसले. शेजारच्या बाकावरील सतेज पाटील, एकनाथ खडसे यांच्याशी त्यांच्या गप्पा सुरु होत्या.
सुमारे बेचाळीस मिनिट उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित राहून कामकाज पाहिले. यावेळी अन्य आमदारांसोबत त्यांच्या खाणाखुणा सुरु होत्या. अशातच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चोपदार यांच्या हस्ते उद्धव ठाकरे याना चिठ्ठी पाठविली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टेबलाजवळ येत उपसभापती यांनी पाठविली आहे असे सांगितले. ठाकरे यांनी ती चिठ्ठी घेऊन तशीच टेबलावर ठेवली.
याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत नमस्कार केला. पण, ठाकरे यांचे लक्ष नसल्याने त्यांनी आमदार अनिल परब यांच्यादिशेने हातवारे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहात बसूनच नमस्कार केला. काही वेळातच उद्धव ठाकरे सभागृहातून जाण्यास निघाले. नीलम गोऱ्हे यांनी लिहिलेली ती चिठ्ठी हातात घेत उद्धव ठाकरे सभागृहाबाहेर गेले.
विधिमंडळाच्या नियमांनुसार कोणत्याही सदस्याला कोणत्याही अधिवेशनात अर्धा तास सभागृहात उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी चाळीस मिनिटे उपस्थित राहून या नियमाचे पालन केले. परंतु, नीलम गोऱ्हे यांनी आधी पक्षाला सोडचिट्ठी दिली आणि आज उद्धव ठाकरे याना चिट्ठी दिल्यामुळे विधानभवनात याची एकच चर्चा सुरु होती.