सांगलीतल्या मासे विक्री करणाऱ्या महिला जेव्हा मासेमारी सोडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धावतात
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अचानक गदारोळ सुरु झाला. यावेळी पोलीस पुढे आले. अचानक गोंधळ उडाल्याने रसत्याने ये-जा करणारे नागरीकही घटनास्थळी थांबले.
सांगली : सांगलीच्या (Sangli) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अचानक गदारोळ सुरु झाला. यावेळी पोलीस पुढे आले. अचानक गोंधळ उडाल्याने रसत्याने ये-जा करणारे नागरीकही घटनास्थळी थांबले. काय झालं ते आधी समजलं नाही. नंतर धक्कादायक माहिती समोर आली. काही महिला अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होते. विशेष म्हणजे त्यांनी तसा प्रयत्न देखील केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान साधलं. पोलीस घटनास्थळी योग्य ठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या घटेनमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विटा येथील मासे विक्रेत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचत महिला मासे विक्रेत्यांनी हातातला कॅन घेऊन पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी महिलांच्या हातून कॅन हिसकावून घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मासे विक्रेत्यांच्या व्यवसायिक स्पर्धेचा संघर्ष पेटला
सांगलीच्या विटा शहरामध्ये मासे विक्रेत्यांच्या व्यवसायिक स्पर्धेचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. बंदिस्त फिश मार्केट असताना अनेक विक्रेते मार्केटच्या बाहेर रस्त्यावर ठिकठिकाणी मासे विक्री व्यवसाय करत आहेत. त्याचा फटका फिश मार्केटमधल्या विक्रेत्यांना बसत आहे.
विटा नगरपालिकेने फिश मार्केट व्यतिरिक्त बाहेर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्यावर कारवाई करावी आणि या बेकायदेशीर मासे विक्री व्यवसाय बंद करावी,अशी मागणी मासे विक्रेत्यांनी विटा नगरपालिकेकडे केली होती.
मात्र कारवाईच्या बाबतीत नगरपालिकेकडून टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या मासे विक्रेत्यांनी, आज थेट सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिला मासे विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गाडीतून उतरलेल्या महिलांनी हातामध्ये पेट्रोलचा कॅन घेऊन उतरताच, या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी महिलांच्या हातातला कन काढून घेतला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
यावेळी या मासे विक्रेत्यांनी जोरदार निदर्शने करत तातडीने विटा शहरात रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.
प्रशासन काय कारवाई करणार?
मासे विक्रेत्या महिलांनी इतकं टोकाचं आंदोलन केल्यानंतर आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महिला मासे विक्रेत्यांनी तर प्रशासनाकडे कारवाईची मागणी केलीय. त्यासाठीच त्यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी प्रशासन मासे विक्रेत्यांसोबत योग्य समन्वय साधून तोडगा काढणं अपेक्षित आहे. प्रशासनाकडून फिश मार्केटच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्यांची समजूत काढली जाते का किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.