Video Vidarbha Flood : विदर्भात पुराचा हाहाकार, वर्धा, गडचिरोलीत गंभीर स्थिती, पूरपरिस्थिती बघा एक क्लिकवर…
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं कालखेड जवळील नाल्याला पूर आला. संग्रामपूर मार्गावरील रस्ते वाहतूक बंद झाली. वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला.
नागपूर : विदर्भात (Vidarbha) पावसाचा जोर अद्याप कायम आहे. ठिकठिकाणी पूर आला. कित्तेकांना विस्थापीत व्हावे लागले. पुरामुळं जागोजागचे रस्ते बंद आहेत. याचा फटका रुग्ण तसेच प्रवाशांना बसला. वर्धा, गडचिरोलीतील पूरपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. या पुराचा आढावा टीव्ही 9 च्या विदर्भातील सर्व रिपोर्टर्सनी ग्राऊंड वर जाऊन घेतला. भर पावसात कुणी छत्री (Umbrella) घेऊन, तर कुणी रेनकोट (Raincoat) घालून भर पावसात पुराच्या बातम्या देत होते. टीव्ही 9 च्या युट्यूब टीमनं या साऱ्यांच्या फुटेजचे व्हिडीओज तयार केले. या व्हिडीओजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यामुळं विदर्भातील बहुतेक सर्व व्हिडीओच एकत्र करून विदर्भातील पूरपरिस्थिती एका क्लिकवर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वर्ध्यात 400 नागरिक अडकले
राज्यातील तीन जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर आहे. वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या तीन जिह्यांचा त्यात समावेश आहे. एनडीआरएफचं बचावकार्य वेगानं सुरू आहे. वर्ध्यातील पुरात 400 नागरिक अडकल्याची माहिती आहे.
यवतमाळात दोन जण पुरात झाडावर चढले
यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गामुळं बेंबळा नदीला पूर आलाय. सकाळपासून पाऊस कोसळत आहे. शेतावर कामासाठी गेलेले दोन नागरिक पुरात अडकलेत. जीव वाचविण्यासाठी दोन्ही नागरिक झाडावर चढले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची चमू दाखल झाली.
कोराडीत राखेमुळं 47 हेक्टर शेतीचे नुकसान
नागपूर जिल्ह्यातील कोराडीत राखेचा बंधारा फुटला. संपूर्ण राख 47 हेक्टर शेतीवर पसरली. धान, कापूस, मोसंबी, फळभाज्या यांचं नुकसान झालं आहे. 74 जणांचं नुकसान या राखयुक्त पाण्यामुळं झालंय. कृषी विभागाचे अधिकारी काय उपाययोजना करायच्या ते सांगणार असल्याचं जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितलं.
यवतमाळात पुलावरून धोकादायक वाहतूक
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही गावांचा सपर्क तुटला. बाबुळगाव गावालगत पाण्याचा वेढा आहे. पुलावरून पाणी वाहत आहे. या धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे.
भंडाऱ्यात वैनगंगेच्या पुराचा फटका
भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदीचे पुरातून पाणी वाहत आहे. गोसे धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
वर्ध्यात निधा गावाला चहुबाजूने पुराचा वेढा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील निधा गावाला चहुबाजुने पुराचा वेढा आहे. दहा ते बारा फुटांपर्यंत पूर आहे. त्यामुळं लोकं उंच भागावर पोहचले आहेत. एनडीआरएफची चमू गावात पोहचली आहे. समुद्राप्रमाणे पाणी या गावात आहे.
अमरावतीतील चारगड नदीवरील पूल वाहून गेला
अमरावती जिल्ह्यातील चारगड नदीवरील पूल वाहून गेला. पुलावरील वाहतूक बंद झाली. घाटलाडकी ते मोर्शी रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. चारगड नदीला मोठा पूर आलाय. पुरामुळं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
पुरामुळं नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवे बंद
नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवे बंद झाला. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रायपूर-कासारखेड पुलावरून पाण्यामुळं महामार्ग बंद आहे. पुलावरून तीन फूट पाणी असल्याने वाहतूक बंद झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रवाशांची चांगलीच वाहतूक कोंडी झाली.
वाशिममध्ये काटेपूर्ण नदी कोपली
वाशिम जिल्ह्यातील मालेगावात मुसळधार पाऊस सुरू होता. काटेपूर्णा नदीला पूर आला. पुरामुळं रुग्णांसह नातेवाईक अडकून पडले. काटेपूर्ण नदीवरील पुलावर पाणीचं पाणी होते. अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
यवतमाळात खरिपाचे पीकं धोक्यात
यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळं खरीपाचं पीक धोक्यात आलंय. यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. पावसामुळं रस्त्यावरील रहदारी कमी झाली होती. बहुतांश शाळांना पावसामुळं सुटी देण्यात आली आहे. संततधार पावसामुळं धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे.
देवळी, सेलू तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
वर्ध्यातील देवळी, सेलू तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळं परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते. गावातील अनेक रस्ते बंद आहेत. गेल्या काही वर्षांतला मोठा पूर आहे. चार-पाच गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची टीम पोहचली.
चंद्रपुरातील इरई नदीचे रोद्ररूप
चंद्रपुरातील इरई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पुरस्थिती कायम आहे. चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. तहसील कार्यालय, माणिकनगर भागात पुराची भीती व्यक्त केली जात आहे. चिमूर ते वरोरा आणि कांपा मार्ग बंद आहे. शहरालगतचे इरई धराणाचे सर्व सात दरवाजे उघडले.
बुलडाण्यातील संग्रामपूर मार्गावरील वाहतूक ठप्प
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं कालखेड जवळील नाल्याला पूर आला. संग्रामपूर मार्गावरील रस्ते वाहतूक बंद झाली. वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला. नाल्याचे पाणी शेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मुसळदार पावसाने बुलडाण्यात नाल्याला पूर आला.
गडचिरोलीत पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविले
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये भीषण पूरपरिस्थिती आहे. बाजारपेठ पुराच्या पाण्यात सापडली. भामरागड शहराला पुराच्या पाण्यानं विळखा दिला. व्यापारी आणि नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. इंद्रावती नदीला पूर आला. आलापल्ली-भामरागड-छत्तीगड महामार्ग बंद आहे.