‘त्यांनी पक्षावर लोकांना हायजॅक करू दिलं, आणि…’, राऊतांच्या टीकेला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवांनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली. चंद्रचूड यांनी या टीकेला उत्तर देताना न्यायालयावर राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकरणे प्रलंबित असल्याचे आणि न्यायालयाचे कामकाज स्वतंत्र असल्याचे सांगितले. राऊतांच्या आरोपांना त्यांनी तीव्र शब्दात खोडून काढले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत केवळ 46 जागांवर यश आलं आहे. या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला होता. “धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना ते घटनात्मक निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदललं असतं. तुम्हाला आज जे चित्र दिसतंय ते तुम्हाला नक्कीच दिसलं नसतं. त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले आहेत. आतासुद्धा कुणाही कुणाला विकत घेऊ शकतं. कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकतं. कारण दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींची भीती राहिलेली नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला धनंजय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय चंद्रचूड यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “आम्ही काम करत नाही असं दाखवा तेव्हा हा आरोप बरोबर ठरतो”, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. तसेच “आमच्या इथे 20 वर्षांपासूनचे अनेक महत्त्वाची प्रकरणं प्रलंबित आहेत. आम्ही कोणत्या प्रकरणावर सुनावणी घ्यायची हे एक पक्ष किंवा व्यक्ती ठरवू शकत नाही”, असंही चंद्रचूड म्हणाले आहेत.
प्रश्न – महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेनं आरोप केला आहे की, इतिहास चंद्रचूड यांना माफ करणार नाही, त्यावर काय सांगाल?
उत्तर : “त्यांनी पक्षावर लोकांना हायजॅक करू दिलं, जो उशीर झाला आणि जो निर्णय देण्यात आला. आम्ही काम करत नाही असं दाखवा, तेव्हा हा आरोप बरोबर ठरतो. आमच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरण होते. सुप्रीम कोर्ट कुठल्या प्रकरणावर सुनावणी घेणार हे ठरवण्याचा राजकीय पक्षाला अधिकार नाही. चंद्रचूड यांनी कुठल्या प्रकरणावर सुनावणी घ्यायची हा सरन्यायाधीशांचा अधिकार आहे. आमच्याकडे 20-20 वर्षे जूनी प्रकरण प्रलंबित आहेत, आमच्याकडे मोजकी लोकं आहेत आणि वेळेत कसं सुनावणी करणार?”, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले.
प्रश्न – देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यात राजकीय अस्थिरता होती. त्यामुळे महत्वाचा पक्ष फुटला?
उत्तर : “खरी अडचण आहे की जर, मी त्यांचा अजेंडा फॉलो केला तर त्यांना वाटतं की स्वतंत्र आहे. इलेक्ट्रॉल बॉण्डवर मी निर्णय दिला, अलीगढ मुस्लिम केस, मदरसा संदर्भात निर्णय दिला. आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेत. आम्ही त्यांच्या प्रकरणावर निर्णय दिला नाही म्हणजे दुसऱ्यांनी ठरवलेला अजेंडा आम्ही फॉलो नाही करणार. आम्ही ठरवणार की कुठल्या प्रकरणावर सुनावणी होणार. चांगले वकील, पैसा, आणि पद असल्यामुळे आम्ही त्यांची केस ऐकावं असं होणार नाही. आमच्यावर कुठलेही प्रकरण घ्यायचे की नाही ह्या संदर्भात दबाव नसतो”, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले.