‘तुम्ही दुरूनच दर्शन घ्या’; माजी खासदाराला राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला
मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचं समोर आलं आहे. सवळं न नेसल्यानं पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याचं समोर येत आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचं समोर आलं आहे. सवळं न नेसल्यानं पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला. यावरून पुजारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाल्याची माहिती, रामदास तडस यांनी दिली आहे. वर्ध्यातील देवळी येथील राम मंदिरात हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय म्हणाले तडस?
दर वर्षी रामनवमीच्या दिवशी मी दर्शनासाठी राम मंदिरात जातो. गेल्या चाळीस वर्षांपासून मी दर्शनाला जातो. मी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन स्वत: रामाची पूजा करतो. माझी पत्नी माझ्या सोबत असते. माझे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत असतात. रामाची पूजा केल्यानंतर आम्ही आमच्या दिवसभराच्या कार्यक्रमाला जातो. परंतु मी यावर्षी मंदिरात गेल्यानंतर तिथला पुजारी जो पुजारी आहे, तोच तिथला ट्रस्टी आहे. तो पुजारी पुण्याला राहातो आणि फक्त रामनवमीला इथे येतो. त्यांनी मला मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी मनाई केली.
तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, दुरूनच दर्शन घ्या, तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते दुरून दर्शन घ्या, असं त्या पुजाऱ्याने आम्हाला सांगितलं. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की आम्ही चाळीस वर्षांपासून दर रामनवमीला इथे येतो. हे बरोबर नाही. एकीकडे रामावर माझी श्रद्धा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांसाठी भव्य रामाचं मंदिर उभारलं आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला मनाई करता, हे योग्य नाही. त्यावर ते म्हणाले तुम्ही सोवळ घातलं नाही. त्यामुळे तुम्हाला आत येता येणार नाही.
मग मी त्यांना विचारलं तुम्ही कसे गेले, त्यावर ते म्हणाले मी सोवळं घातलं आहे. मला वाटतं हे त्यांचं बोलणं सयुक्तिक नव्हतं, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा मी म्हटलं आज रामनवमीचा दिवस आहे. आज संघर्ष बरोबर नाही. मी कार्यकर्त्यांना समजावलं, आमच्या आमदारांनी सुद्धा या पुजाऱ्याला समज दिली. या देवस्थानाची दोनशे एकर जमीन आहे. मात्र तरी देखील सर्व गोष्टी आम्ही आमच्या पैशांमधून मंदिरासाठी करतो, अशी त्यांची तिथे मक्तेदारी चालते, असं तडस यांनी म्हटलं आहे.