महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी राज्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीच्या रिंगणात मनसे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी देखील उडी घेतल्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे. काही ठिकाणी या पक्षांमुळे मतदानाचं गणित देखील बिघडू शकतं. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांच्या शर्यतीमध्ये आघाडी घेतली असून, वंचितकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 16 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये तीस जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चौथ्या यादीमध्ये शहदा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हादगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी,कोरेगाव, कराड दक्षिण अशा सोळा मतदारसंघाचा समावेश आहे.
बंडखोरी रोखण्याचं पक्षांपुढे आव्हान
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यंदा महाविकास आघाडीविरोधात महायुती असाचा सामना रंगण्याची शक्यता आहे. जागा वाटपांबाबत पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. लवकरच जागा वाटप जाहीर करण्यात येईल. या सर्वांमध्ये वंचितनं आघाडी घेतली आहे. पक्षाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी उमेदवारांची यादी जाहिर झाल्यानंतर इच्छुकांंची नाराजी दूर करून पक्षातील बंडखोरी रोखण्याचं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही जागांवर उमेदवारांची नावं उशिरानं घोषित करण्यात आली, त्याचा मोठा फटका हा त्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र यावेळी ही चूक टाळून लवकरच महायुतीकडून उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे.