TV9 special:जातीयवादाच्या आरोपापासून ते मुख्यमंत्र्यांना शनी म्हणण्यापर्यंत, या राजकीय नौटंकीत नवनीत राणा-रवी राणांना नेमकं हवयं तरी काय?
हे दोघेही पती-पत्नी गेल्या काही काळापासून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर एकदम चर्चेत आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेले हे दोघेही त्यांच्या आताच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेनं चर्चेत आहेत. त्यांचा कार्यक्रम काय, हेतू काय, साध्य काय, हे सगळंच भल्याभल्यांना अनपेक्षित आहे.
मुंबई – नागपुरात पुन्हा हनुमान चालिसा पठणाच्या निमित्ताने आज पुन्हा राज्यात आणि माध्यमांत नवनीत राणा (Navneet Rana)आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana)चर्चेत राहिले. त्यांचे दिल्लीहून परत आगमन झाल्याने त्याचा जल्लोषही करण्यात आला. इतकं नेमकं राज्याच्या राजकारणात चाललंय काय,(Maharashtra Politics)असा प्रश्न अनेकांना पडला असेल. गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात जी दोन नावे सातत्याने चर्चेला येत आहेत, ती आहेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची. हे दोघेही पती-पत्नी गेल्या काही काळापासून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर एकदम चर्चेत आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेले हे दोघेही त्यांच्या आताच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेनं चर्चेत आहेत. त्यांचा कार्यक्रम काय, हेतू काय, साध्य काय, हे सगळंच भल्याभल्यांना अनपेक्षित आहे.
हनुमान चालिसाच्या निमित्ताने काय झालं मुंबईत?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींसमोर हनमान चालिसा पठणाचे आदेश मनसैनिकांना दिले असताना, या राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण थेट मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर करण्याची घोषणा अमरावतीत केली. यावरुन शिवसेना-राणा बराच वादंग रंगला. हे दोघेही मुंबईत आले. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडू नये, यासाठी तंबी दिली. मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकवटले. सत्ताधाऱ्यांनी हा दुर्लक्षित करण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. राणा दाम्पत्य घराबाहेर प़डलेच नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं कारण दिलं. त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हनुमान चालिसा पठण त्यांनी टाळलं.
सरकारने अटक केली, देशद्रोहाचा गुन्हा लावला
राणा दाम्पत्य घराबाहेर पडले नाही तरीही त्यांना अटक झाली. देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला. सरकारची ही मोठी चूक ठरली. खासदार नवनीत राणा यांनी तुरुंगात जातीयवादी वागणूक दिल्याची तक्रार थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली. या दाम्पत्याला १४ दिवसांनी जामीन मंजूर झाला खरा, पण त्यांनी बाहेर काहीही बोलू नये, असे आदेश कोर्टाने दिले. मात्र बाहेर पडल्यानंतर रवी राणांनी हनुमान चालिसा वाचली, दोनच दिवसांत पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडण्याचं काम त्यांनी गतीनं हाती घेतलं. थेट मुख्यमंत्र्यांना लढण्याचे आव्हान त्यांनी दिले.
लडाख दौऱ्यात राऊतांसोबतचे फोटोही गाजले
हे प्रकरण संपतेना संपते तोच नवनीत राणा आणि संजय राऊत एका समितीच्या कामाच्या समीक्षेसाठी लडाखच्या दौर्यावर एकत्र दिसले. परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदेच्या स्थायी समितीचे हे दोघेही सदस्य आहेत. या दौऱ्यात रवी राणाही सोबत होते. त्यातच रवी राणा-संजय राऊत यांचे एकत्र जेवतानाचे फोटो सोशल मीडियावर आले. त्याचीही मोठी चर्चा झाली. मात्र परतल्यावर नवनीत राणा यांनी शिवसेनेचा विरोध सुरुच राहील हे स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात त्यांच्या मुंबईतील घरात अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महाापालिकेनंही कारवाईची टांगती तलवार त्यांच्या मागे लावली.
देशद्रोह आणि लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार भोवली
देशद्रोहाचा गुन्हा सरकारने हनुमान चालिसा प्रकरणात लावल्यानंतर, याची सुप्रीम कोर्टात चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाने देशद्रोहाचे गुन्हेच यापुढे याची व्याख्या होईपर्यंत दाखल करु नका, असे आदेश काढले. हा खटला जुना होता, राणांच्या अटकेने याचे आपसूक श्रेय राणा दाम्पत्याकडे गेले. जेलमध्ये देण्यात आलेल्या वागणुकीबाबत नवनीत राणा यांची लोकसभा अध्यक्षांशी भेट झाली. त्यानंतर आता राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आय़ुक्तांनाही दिल्लीत याप्रकरणी बोलावण्यात आले आहे.
राईचा पर्वत केला कुणी?
२०१९ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून जिंकलेल्या नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या रवी राणांना खरी मदत केली ती राष्ट्रवादी काँग्रेसने. आता मात्र रवी राणा आणि नवनीत राणा हे महाविकास आघाडीची बाजू सोडून भाजपाच्या नेत्यांपेक्षाही तीव्र झाले आहेत. खरंत हनुमान चालिसा प्रकरणात शिवसेनेनं दुर्लक्षाने राणा कुटुंबाला मारलं असतं, तर चांगलं झालं असतं. पण शिवसेनेसाठीही ही कार्यक्रम म्हणून संधी होती. त्यांनीही हे आव्हान स्वीकारल्याने राणा दाम्पत्याला हवा मिळाली. हनुमान चालिसा प्रकरणानंतर अटकेत असलेल्या राणांना भेटण्यासाठी सोमय्या गेले, त्यांच्यावर कथित हल्ला झाला. या सगळ्या प्रकरणात भाजपा त्यांच्या पाठिशी आहे, अशीही चर्चा आहे. मात्र असे असतानाही राणांच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसतायेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या आंदोलनाला आक्षेप घेत मातोश्री ही का मशीद आहे का, असा सवाल उपस्थित केलाय. शिवसेना, राष्ट्रवादी राणांच्या विरोधात आहेच. आता परिस्थिती अशी आहे की, राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांना राणांबाबत भूमिका मांडाव्या लागत आहेत. त्यांचे पालकत्व कुणाचे याबाबत मात्र संभ्रम आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार, नवनीत राणांचा प्रवास
नवनीत राणा यांचे मूळ नाव नवनीत कौर, त्यांचे आई वडील मुळचे पंजाबी, त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. नवनीत यांचे बालपण मुंबईत गेले. बारावीनंतर त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. २००३ ते २०१० या काळात त्यांनी दाक्षिणात्य सिनेमात अभिनेत्री होत्या. या काळआत २० ते २३ चित्रपटांतून त्यांनी काम केले. २०११ साली अमरावतीत बाबा रामदेव यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी रवी राणा यांच्याशी विवाह केला. २०११ साली रवी राणा बडनेऱ्याचे आमदार होते. या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विवेक ओबेरॉय, सुब्रतो रॉय यांची उपस्थिती होती. लग्नानंतर त्यांनी चित्रपटांना रामराम केला आणि २०१४ साली पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावतीतून निवडणूक लढवली. नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेच्या आनंदराव आडसुळांसमोर त्या पडल्या. २०१९ साली मात्र त्या अपक्ष आमदार म्हणून आडसुळांविरोधात निवडून आल्या, त्यावेळी त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला होता. त्यांचा शिवसेनेसोबतचा संघर्ष हा २०१४ पासूनचा मानला जातो. यातूनच उद्धव ठाकरे हे राज्याला लागलेला शनी आहे, अशी धारदार टीका त्या करीत आहेत.
रवी राणांची ओळख गारुडी राजकारणी
रवी राणा हे मुळचे अमरावतीचे असून ते वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. बांधकाम आणि जमीन व्यावसायिक अशी त्यांची ओळख राहिलेली आहे. जनसामान्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. २००८ साली अमरावतीत बाबा रामदेव यांच्या योग शिबिराने ते प्रसिद्धीत आले. २००९ पासून सलग तिनदा ते बडनेरा मतदारसंघातून निवडून येतायेत. २००९ ते १४ या काळात ते आघाडीच्या बाजूने होते. २०११ साली शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी जेलमध्ये आंदोलन केले होते. मेळघाटातही राणे दाम्पत्याने आदिवासींसाठी मोठे काम केले आहे. २०१९ नंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या धूर्त राजकारणामुळे त्यांची ओळख गारुडी आमदार अशी आहे.
नौटंकीचा काय हेतू, काय साध्य करायचंय
सध्या अपक्ष असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांचं भविष्यातील राजकारण सुरक्षित करत असल्याचा कयास बांधण्यात येत आहे. आधी काँग्रेस आघाडीला, आता नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा देत पुढच्या आमदारकीचं आणि खासदारकीचं तिकिट नक्की करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. अमरावतीत कित्येक वर्ष शिवसेनेचा खासदार यापूर्वी होता, पण त्यांनी मतदारसंघात विशेष काम न केल्यानेच २०१९ साली ही संधी नवनीत राणा यांना चालून आली. यातच भर म्हणजे नवनीत राणांच्या जात पडताळणीचे प्रकरणही कोर्टात सुरु आहे. २०२४ निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढतील, अशा स्थितीत खासदारकी आणि आमदारकीचं भाजपाचं तिकिट आपल्या पदरात पाडून घेण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न दिसतो आहे. स्वार्थी राजकारण करत, संपूर्ण राज्यात माध्यमांचा वापत करत चर्चेत राहिल्याने आलेलं वलय, आज त्यांना दखल घेण्याच्या पातळीवर घेऊन आलेलं आहे. सध्याच्या काळात कसं मोठं येता, त्यासाठी कोणत्याही पक्षाची कशी गरज नाही, हेही राणा दाम्पत्यानं दाखवून दिलं आहे. भल्याभल्या राजकारण्यांना जे जमलं नाही, ते त्यांनी गेल्या दोन तीन महिन्यांच्या काळात करुन दाखवलंय, हे मात्र नक्की. राज्याच्या बदलत्या राजकारणाचा हा भाग म्हणावा लागेल. या राजकारणाचं पुढचं स्वरुप आणखी काय असेल यासाठी मात्र वाट पाहावी लागणार आहे.