शिवसेना आणि भाजपची आता कुठल्याही क्षणी युती होईल अशी महाराष्ट्रात चर्चा असतानाच
शिवसेनेचं दुखणं झालेल्या नारायण राणेंना भाजपानं केंद्रीय कॅबिनेट मंत्री केलेलं आहे. युती असतानाच
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशालाच सेनेनं त्यावेळेस अप्रत्यक्ष विरोध केला होता. आता दोन्हींची
युती होण्याची चर्चा असतानाच राणे थेट मोदी मंत्रिमंडळात दाखल झालेत. याचा भाजप-सेनेच्या
आगामी राजकारणावर थेट परिणाम होईल अशी चर्चा आहे.
राणे म्हणजे शिवसेनेची जखम
शिवसेनेनं नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. बाळासाहेबांनी तो विश्वास दाखवला. पण बाळासाहेबांच्या
हयातीतच राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि बाहेर पडले. उद्धव ठाकरेंची शिवसेनेत
चलती सुरु झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून राणे बाहेर पडले. ते फक्त बाहेरच पडले
असते तर शिवसेना नेतृत्वाला फार वाईट वाटलं नसतं. पक्ष म्हटल्यानंतर लोक येत जात राहणार.
पण राणे बाहेर पडले आणि त्यांनी कधी शिवसेनेवर तर कधी ठाकरे कुटुंबावर थेट हल्ला चढवला.
बाळासाहेबांचा त्यांनी आदर राखला पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर मात्र एकेरी भाषेत हल्ले चढवले.
आजही राणेंचा, त्यांच्या मुलाचा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याशिवाय
दिवस जात नाही. विशेष म्हणजे टिका करताना भाषेची कुठलीच मान-मर्यादा पाळलेली नसते.
राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे.
शिवसेनेच्या जखमेवर मीठ
कोकण हा शिवसेनेचा बेस आहे. कोकणातून मुंबईत आलेला मराठी माणूस पक्का शिवसैनिक
असतो. राणेंमुळे मात्र त्यात विभागणी झालीय. सिंधुदुर्गात शिवसैनिक आणि राणे समर्थक
यांचे अधूनमधून राडे होत असतात. आता तर राणेंना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे
संघर्ष तीव्र होऊ शकतो. राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे. राणे भाजपचे आधी सहयोगी नेते झाले
आणि नंतर ते भाजपच्याच कोट्यातून थेट राज्यसभेवर गेले. भाजपात गेल्यावर राणेंनी शिवसेना आणि
त्यांच्या नेत्यांवरचे एकेरी भाषेतले हल्ले आणखी तीव्र केले. अशा नेत्याला केंद्रात मंत्री केल्यामुळे हे
शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. त्याची चर्चा सुरु झालीय.
भाजप-सेना युती खडतर होणार?
अलिकडेच उद्धव ठाकरे हे दिल्लीत नरेंद्र मोदींना एकांतात अर्धा तास भेटले. त्या भेटीनंतर राज्यात
शिवसेनेचा सुरच बदलून गेला आहे. राऊतांनी मोदींची स्तुती केली आहे. एवढच नाही तर पंतप्रधानपदासाठी
इतर कुठला चेहरा नसल्यामुळे आगामी निवडणुकीतही मोदीच पंतप्रधान होतील असही राऊत म्हणाले.
एका भेटीनं बरंच काही बदललेलं दिसतं आहे. त्यामुळेच भाजप-सेना पुन्हा एकत्र येऊ शकतात
अशीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण राणेंना अचानक केंद्रात मंत्री केल्यानं युती होणार कशी?
कारण शिवसेनेसाठी राणे हा इगोचा इश्शू आहे. सेनेच्या टिकाकारलाच मंत्री केलंय त्यामुळे शिवसेना-भाजप
आणखी दुरावतील की एकत्र येतील? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. त्यामुळे राणेंना मंत्री करणं म्हणजे
भाजप-सेनेची युतीचा मार्ग आणखी खडतर करण्यासारखं आहे हे निश्चित.