जिवंतपणी मरणयातना अन् मृत्यूनंतरही सुटका नाही… नदीच्या पुरातून अंत्ययात्रा; हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग
देवनाळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे यमुनाबाई यांचा अंत्यसंस्कार कसा करावा? असा प्रश्न सर्वांना पडला. शेवटी डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट काढत अंत्यसंस्कार करण्यात आला. नदीवर पूल असता किंवा जोडमोहा गावात स्मशानभूमी असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
देशाला स्वातंत्र मिळून सात दशके लोटली आहे. परंतु अजून पायाभूत सुविधा सर्वत्र तयार झालेल्या नाहीत. ग्रामीण भागात रस्ते अन् पूल नसल्याची विदारक परिस्थिती अधूनमधून समोर येत असते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून जावे लागते. काही ठिकाणी बस नसल्यामुळे पाच-दहा किलोमीटर चिमुकल्यांचा प्रवास होता. आता विदर्भातून मन सून्न करणाऱ्या दोन बातम्या आल्या आहेत. मृत्यूनंतर शेवटचा प्रवास सुखकर झालेला नाही. मृत्यू झालेल्या ७५ वर्षीय महिलेच्या आप्तेष्टांना पुराच्या पाण्यातून वाट काढत त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. ७५ वर्षीय महिलेचा शेवटचा प्रवासही मरणयातना सहन करणारा ठरला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात घडली.
पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा
कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातील यमुना नीळकंठ भोयर (७५) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. गावातील स्मशानभूमी देवनाळा नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. या नदीवर पूल झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात कोणाचे निधन झाल्यास अन् देवनाळा नदी पूर असल्यास पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागते. यामुळे सोमवारी यमुनाबाई यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. त्या लोकांनी जिवावर उदार होत त्यांना अंतिम निरोप दिला.
डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट
देवनाळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे यमुनाबाई यांचा अंत्यसंस्कार कसा करावा? असा प्रश्न सर्वांना पडला. शेवटी डोक्यावर तिरडी घेऊन नदीतून वाट काढत अंत्यसंस्कार करण्यात आला. नदीवर पूल असता किंवा जोडमोहा गावात स्मशानभूमी असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील दहिवडी गावामध्ये अशीच घटना घडली. दहिवडी गावामध्ये बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीला टीन शेड नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावर प्रेतांचे अंतिम संस्कार करावे लागतात. गावातील सुमनबाई ब्राह्मणे (वय 65 वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक तसेच ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले. परंतु त्याठिकाणी जायला तर रस्ता नाही. तसेच मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. यामुळे एकच तारांबळ उडाली आणि मृतदेह पेटण्याअगोदरच भिजल्याने मृतदेहाची विटंबना झाली. पाऊस उघडल्यावर पुन्हा नातेवाईकांना लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले.