गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोठी कारवाई, चकमकीत मारला गेल्याची चर्चा असलेला मिलिंद तेलतुंबडे कोण?
या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत खात्रीलायक माहिती देण्यात आलेली नाही. अशावेळी मिलिंद तेलतुंबडे नेमका कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान मिळाल्याची माहिती मिळतेय. गडचिरोली पोलिस आणि गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत खात्रीलायक माहिती देण्यात आलेली नाही. अशावेळी मिलिंद तेलतुंबडे नेमका कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. (Who is Milind Teltumbde? Discussion that Milind Teltumbde was killed in anti-Naxal operation)
मिलिंद तेलतुंबडे कोण?
माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेची देशभरातील नक्षलवादी कारवायांमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास या नावाने ओळख असलेल्या हा माओवादी नेता आज गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत ठार पोलीसांच्या कारवाईत ठार झाल्याचं बोललं जात आहे. मिलिंद तेलतुंबडेच्या डोक्यावर 50 लाख रुपये इनाम घोषित होतं. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरून नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झाला असेल तर नक्षलवाद्यांसाठी हा मोठा झटका असणार आहे.
मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता,उर्फ कविता ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
मिलिंद तेलतुंबडेला नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीत स्थान
लोकांच्या घटलेल्या पाठिंब्यामुळे चिंतेत असलेल्या नक्षलवाद्यांनी 2014 मध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदार सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला नक्षलवाद्यांमध्ये सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय समितीत पहिल्यांदाच दलित समाजाला प्रतिनिधित्व देऊन नक्षलवाद्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले होते. महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम पाहणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेवर उत्तर गडचिरोली, गोंदिया व बालाघाट या विभागाची जबाबदारी होती.
दिलीप वळसे-पाटलांकडून दुजोरा नाही
मिलिंद तेलतुंबडे पोलिसांसोबतच्या चकमकीत मारला गेल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. दरम्यान वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, असंही वळसे पाटील म्हणाले.
इतर बातम्या :
Breaking : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Who is Milind Teltumbde? Discussion that Milind Teltumbde was killed in anti-Naxal operation