Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींची उंची 4 फुटांपर्यंतच, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 10 सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray on Ganesh Murti) केले.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच श्रीगणेशाच्या मूर्तीही 4 फुटापर्यंत असावी. गणेशोत्सवाच्या काळात कुणीही कुठेही गर्दी करु नये. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच! असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. (Ganeshotsava 2020 CM Uddhav Thackeray on Ganesh Murti Height limit 4 feet)
“गेल्या काही दिवसांपासून यंदा गणेशमूर्तींची उंची किती असावी? या संदर्भात मुख्यमंत्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत होते. मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. या चर्चेनंतर श्रीगणेशाच्या मूर्तीही 4 फुटापर्यंत असावी,” असा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.
“‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“आता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजाजन घरोघर येतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Ganeshotsava 2020 CM Uddhav Thackeray on Ganesh Murti Height limit 4 feet)
“मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी 11 दिवस प्रचंड गर्दी होत असते. मात्र निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा, यावर एकमत झाले,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना
- यंदा गणरायांचे आगमन घरगुती तसेच सार्वजनिक उत्सव मंडपांत होईल.
- गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊन येतील.
- गणपतीच्या भव्य मूर्तींऐवजी 4 फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना करावी
- मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन आणि विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे.
- मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे.
- मंडपात नेहमीची गर्दी नको.
- गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल.
- मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असावेत.
- उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये.
- शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा.
“श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल. गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य व संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा आणि लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे 1 कोटी रुपये कोरोना लढाईसाठी खर्च केले. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श आणि परंपरा सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल,” असे मुख्यमंत्री म्हणाले. (Ganeshotsava 2020 CM Uddhav Thackeray on Ganesh Murti Height limit 4 feet)
Ganeshotsava 2020 | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन https://t.co/FswB5ZQ8WX #Ganeshotsava @CMOMaharashtra @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2020
संबंधित बातम्या :
Ganeshotsav 2020 | गणेशमूर्तींची उंची किती असावी? मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार