गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो आता आपली राजकीय खेळी सुरू करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. कारण लॉरेन्स बिश्नोई यांच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्रातील एका गटाने रिटर्निंग ऑफिसरकडे फॉर्म मागवला आहे.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसरला लिहिलेल्या पत्रात उत्तर भारतीय विकास सेना पक्षाने एबी फॉर्मची मागणी केली आहे. “आम्ही एक राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहोत. पक्षाचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आमच्या उमेदवारांसाठी फॉर्म A आणि फॉर्म B जारी करण्यास अधिकृत आहोत,” असे या पक्षाने त्यांच्या पत्रात लिहिले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, आम्ही आमचे उमेदवार बलकरण ब्रार (लॉरेन्स बिश्नोई) यांना उमेदवारी फॉर्म जारी करण्याची विनंती करतो. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमानुसार आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत.
लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी उमेदवारी अर्ज मागणारे हे पत्र उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांच्या वतीने लिहिले आहे. त्यावर पक्षाच्या मान्यतेचा शिक्काही आहे. निवडणूक आयोगाकडून लॉरेन्स बिश्नोई यांना ए आणि बी फॉर्म दिले जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात आली आणि काही दिवसांतच या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे कनेक्शन तेव्हा समोर आले जेव्हा या गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. याशिवाय लॉरेन्सने काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या गुंडाने सलमानच्या घराबाहेर गोळीबारही केला होता, त्यामुळे अभिनेत्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली होती.