‘अजित पवार निधी देताना नाराज होते ही वस्तुस्थिती’, गिरीश महाजन यांची खडाजंगीवर पहिली प्रतिक्रिया
"अजित पवार निधी देताना नाराज होते ही वस्तुस्थिती आहे", असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळात जे काही घडलं त्यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांनंतर आता गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी (23 जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात निधीवाटपावरुन वाद झाल्याची चर्चा आहे. याबाबतच्या वृत्तांवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अजित पवार निधी देताना नाराज होते ही वस्तुस्थिती असल्याचं गिरीश महाजनांनी मान्य केलं. पण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांच्यासोबत निधी वाटपावरुन वाद झाला या चर्चा खोट्या असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. आपण अजित पवार यांच्याकडे निधी देण्यात यावा, अशी विनंती केली. अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या जागेवर योग्य आहेत. तर मी ग्रामविकास मंत्री म्हणून माझ्या जागेवर योग्य आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
“अजित पवार निधी देताना नाराज होते ही वस्तुस्थिती आहे. शेवटी ते वित्तमंत्री आहेत. त्यांना राज्याचा सगळा ताळमेळही बघावा लागतो. जमेची बाजू, खर्चाची बाजू देखील बघावी लागते. आम्ही नुकतंच लाडकी बहीण योजनेत 46 ते 47 हजार कोटी रुपये घालवले आहेत. शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं. असं जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा बोझा राज्यावर आला आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की, तुमच्या ज्या काही योजना असतील, तुमच्या विभागाची कामे असतील त्याच्या खर्चात थोडीशी कपात करा, असं त्याचं म्हणणं होतं”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“अजित पवारांचं म्हणणं देखील योग्य आहे आणि आमचा आग्रह धरणंदेखील योग्य आहे. आम्ही त्यांना विनंती केली की, नाही उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला निधी दिला तर मला ग्रामीण भागात रस्ते बांधायचे आहेत, ग्रामीण भागात रस्तांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण यावरुन वाद झाला, खडाजंगी झाली, जमीन विकू का? या अशा ज्या बातम्या आल्या त्या असत्य आहेत. हे वस्तुस्थितीला धरुन नाही. मी त्यांना फक्त विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये विचार करु. पण जमिनी विकू का? यामध्ये कोणतंही सत्य नाही. अजित पवार त्यांच्या जागेवर योग्य होते. माझ्या ठिकाणी मी ग्रामविकास मंत्री म्हणून योग्य आहे”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.