भूकंप की त्सुनामी…? शिवसैनिक पेटले, राजीनामे तयार; काय घडतंय वाशिममध्ये?
भावना गवळी संसदेतील शिवसेनेच्या प्रतोद आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आल्या आहेत. असं असूनही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. सहाव्यांदा त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्या जात आहे. त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना देण्याची चर्चा केली जात आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
शिंदे गटाची पहिली यादी आली पण शिवसेनेच्या संसदेतील प्रतोद असलेल्या भावना गवळी यांना या यादीत स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अधूनमधून वाशिम-यवतमाळमधून संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भावना गवळी यांचं तिकीट धोक्यात आल्याचीही चर्चा आहे. अशातच पहिल्या यादीत भावना गवळी यांच्या नावाचा समावेश नसल्याने ही धाकधूक अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भावना गवळी समर्थक शिवसैनिकही इरेला पेटले आहेत. भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करा, नाहीतर आम्ही राजीनामे देणार, असा इशाराच या शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे गवळी यांना उमेदवारी न दिल्यास वाशिम-यवतमाळमध्ये राजीनाम्यांची त्सुनामी येणार की भूकंप? अशी चर्चा आता रंगली आहे.
वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भावना गवळी यांची उमेदवारी अद्याप घोषित झाली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी आज तात्काळ घोषित करावी अथवा आम्ही राजीनामे देऊ, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वाशिममध्ये शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भावना गवळी यांना आजच उमेदवारी देण्याची मागणी करतानाच तसं न झाल्यास राजीनामे देणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सामूहिक राजीनामे देऊ
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी अद्यापही घोषित करण्यात आली नाही. भावना गवळी यांची उमेदवारी तात्काळ घोषित करावी अन्यथा पदाधिकारी, कार्यकर्ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा देण्यात आला आहे.
रात्री 8 वाजेपर्यंतची डेडलाईन
सलग 30 वर्षापासून यवतमाळ-वाशिम लोकसभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वावर अन्याय का? असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांकडून विचारला जातोय. आज रात्री 8 वाजेपर्यंत उमेदवारी घोषित केली नाही तर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे जिल्हा प्रमुखाकडं देण्याचा इशारा देण्यात आला आहे. भावना गवळी याचं तिकीट घोषित करा… घोषित करा अश्या घोषणा देण्यात आल्या. शाखाप्रमुख, तालुखाप्रमुख, शहर प्रमुख यांच्याकडून जिल्हाप्रमुखाकडे राजीनामे देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण झाले. जिल्हाप्रमुखाने समजवल्यावर कार्यकर्ते झाले शांत झाले.
तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार नाही
अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना विरोध असताना भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली. भावना गवळी यांना कोणाचाही विरोध नाही तरीही त्यांची उमेदवारी जाहीर केली जात नाही. भावना गवळी संसदेतील शिवसेनेच्या प्रतोद आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आल्या आहेत. असं असूनही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. सहाव्यांदा त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्या जात आहे. मात्र भाजपकडून या उमेदवारीला विरोध केल्या जात आहे.
त्यांच्या जागेवर संजय राठोड यांना देण्याची चर्चा केली जात आहे. मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात भावना गवळी यांनाच तिकीट देण्यात यावं. महायुतीने जर दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ आणि महायुतीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही करणार नाी, असा ठराव भावना गवळी समर्थकांनी केला आहे. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, शिवसैनिक पंकज इंगोले यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
घाई गडबड करू नका
दरम्यान, भावना गवळी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मी काम करत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या भावना असणारच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या कामाची दखल घेतील. कार्यकर्त्यांनी घाई गडबड करू नये. लवकरच निर्णय होईल. निवडणुकीत दावेप्रतिदावे होतातच. पक्षश्रेष्ठी निश्चितच माझा विचार करतील. ही पक्षांतर्गत बाब आहे, असं भावना गवळी म्हणाल्या.