एक तीर दोन निशाणे, भाजपचा गोंदियात मोठा गेम, काँग्रेस पक्षासह नाना पटोलेंना मोठा धक्का
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे जवळचे समर्थक आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवांनंतर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. हलमारे यांनी पाटोले यांवर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. काँग्रेस तर राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण आपला विजयरथ विधानसभा निवडणुकीपर्यंत घेऊन जाणं महाविकास आघाडीला जमलं नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांकडून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतची वक्तव्ये केली जात आहेत. असं असताना भाजप पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वोतोपरी तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल कधीही लागू शकण्याची शक्यता असताना भाजपने गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खंद्या समर्थकाने आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपने एकाच बाणातून दोन निशाणे साधल्याची चर्चा आहे.
नाना पटोले यांचे खंदे समर्थक आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आले. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात केवळ एक जागा काँग्रेस पक्षाला जिंकता आली. त्यांनतर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. अखेर नाना पटोले यांचे खंदे समर्थक असलेले आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नीलम हलमारे यांचा पक्षप्रवेशावेळी नाना पटोले यांच्यावर आरोप
भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी गोंदिया शहरातील प्रीतम लॉन या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नीलम हलमारे यांनी भूमिका मांडली. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत छावा संग्राम परिषदेपासून होतो. मागील 20 वर्षे त्यांच्यासोबत काम केलं. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं”, असा आरोप करत नीलम हलमारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नीलम हलमारे यांनी केलेल्या या आरोपांवर आता नाना पटोले यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.