खासगी सीबीएसई शाळांची घाई कशासाठी?, शिक्षण विभागाच्या आदेशाची पायमल्ली
काही खासगी सीबीएसई शाळांनी आतापासून शाळा सुरू करण्यास सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. असे झाल्यास याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : विदर्भात उन्हाचा तडाका सुरू आहे. तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. १७ ते २१ जून रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशावेळी उष्माघाताचे बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही खासगी सीबीएसई शाळांनी आतापासून शाळा सुरू करण्यास सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. असे झाल्यास याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भातील वातावरण उष्ण असल्याने दरवर्षी १ जुलैनंतरच शाळा सुरू होतात.
विदर्भात तापमानाचा पारा ४३ पार
गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाका आजही कायम आहे. जिल्ह्याचे तापमान 43 पार असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ऊन लागतं असते. अशातच गोंदिया जिल्ह्यातील काही खाजगी शाळांनी तसेच सीबीएससी शाळांनी 12 जून पासून शाळा सुरू केल्या होत्या. ही बाब शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या लक्षात आली. त्यावर सर्व खाजगी शाळांना सूचना देऊन 30 जूनपर्यंत शाळा बंद करण्याच्या निर्देश दिलेला आहे.
मृगाचा पाऊस पडलाच नाही
विदर्भातील सर्व शाळा 30 जूनपासून सुरू करण्याच्या सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील काही खासगी संस्थांनी 12 जूनपासून शाळा सुरू केल्या होत्या. सध्या उन्हाचा शेवटचा टप्प्या सुरू आहे. त्याचबरोबर मृग नक्षत्र असूनही जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही.
पावसाळा लांबल्याने नागरिकांना उकाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. कडक उन्हाचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत असून, जनजीवन व्यस्त आहे. विदर्भातील सर्व शाळा 30 जूननंतर सुरू करण्याच्या सूचना सरकारनेच दिल्या होत्या.
शिक्षणाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा
प्रशासनाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील काही खासगी शाळांनी 12 जूनपासून शाळा सुरू केल्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना भर उन्हात शाळेत जावे लागत आहे. या सर्व बाबी पाहता याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने 30 जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. 30 जूनपूर्वी शाळा सुरू झाल्यास कारवाईचा करण्याचा इशारा गोंदियाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी दिला आहे.