महाराष्ट्राच्या सुपुत्राला लेहमध्ये वीरमरण, अख्खं गोंदिया हळहळलं, शोकाकूळ वातावरणात जवानाला अखेरचा निरोप
महाराष्ट्राच्या सुपुत्राला लेह येथे वीरमरण आलं. सुरेश नागपुरे असं 33 वर्षीय जवानाचं नाव आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जवानाचं पार्थिव आज गोंदियात आले तेव्हा हजारो नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
गोंदिया | 9 सप्टेंबर 2023 : भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लडाखच्या लेह येथे वीरमरण आलं आहे. सुरेश हुकलाल नागपुरे असं या वीर जवानाचं नाव आहे. ते 33 वर्षांचे होते. ते 2007 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे नागपुरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश नागपुरे हे तुमखेडा येथील रहिवासी होते. त्यांना कर्तृव्यावर असताना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला. हा धक्का इतका वाईट होता की, हृदयविकाराच्या धक्क्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. आपला जोडीदार गमावल्याचं दु:ख त्यांच्या सहकाऱ्यांना सतावत आहे.
सुरेश नागपुरे यांच्या मृत्यूची माहिती तुमखेडा येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना सैन्याकडून फोनद्वारे देण्यात आली. संबंधित वृत्त तुमखेडा येथे पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. तुमखेडासह संपूर्ण गोंदियात हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. गोंदियाच्या एका जवानाला वीरमरण आल्यामुळे अनेकजण हळहळले. संपूर्ण तुमखेडासह गोंदिया जिल्ह्यात शोकाकूळ वातावरण आहे.
शोकाकूळ वातावरणात वीर जवानाला अखेरचा निरोप
वीरजवान सुरेश नागपुरे यांचे पार्थिव गोंदियात आले. त्यांचं पार्थिव गोंदिया शहरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी हजारो नागरिकांनी नागपुरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. सुरेश नागपुरे यांचं पार्थिव गोंदिया शहरातून त्यांच्या मूळगावी तुमखेडा येथे घेऊन जाण्यात आलं. यावेळी वीर जवान सुरेश नागपुरे अमर रहे अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. अनेकांनी यावेळी जवानाच्या पार्थिवाच्या गाडीवर फुलांनी वर्षावर करत श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला.
सुरेश नागपुरे यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी घेऊन जात असताना हजारो नागरिकांवी गर्दी केली होती. तसेच जवानाचं पार्थिव तुमखेडा येथे पोहोचल्यानंतर जवानाच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. त्यांचा हा आक्रोश काळीज धस्स करणारा होता. जवानाच्या कुटुंबियांनी खूप आक्रोश केला. हे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अतिशय शोकाकूळ वातावरणात जवानाची गावातून अंत्ययात्रा निघाली. सर्व गावकरी आणि गोंदिया जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी सुरेश नागपुरे यांच्या अंत्यविधीत सहभागी होत त्यांना अखेरचा निरोप दिला.