मुख्यमंत्री पदासाठी त्यांना शुभेच्छा, प्रफुल्ल पटेल यांनी कुणाचे केले अभिनंदन?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यात एका चर्चेने वेग घेतला. एकनाथ शिंदे यांच्याकडील मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देणार असल्याची ती चर्चा होती. त्यावर खुद्द अजित पवार यांनी भाष्य केले होते. पण, आता...
मुंबई : 23 ऑगस्ट २०२३ | प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. त्या नेत्याच्या, पक्षप्रमुखाच्या वाढदिवसानिमित किंवा राज्यातील राजकीय वातावरण बदलले तर या कार्यकर्त्यांची ती प्रबळ इच्छा पुन्हा पुढे येते. त्यामुळेच की काय राज्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकलेले दिसले.
अजित पवार यांच्या सत्तेतील समावेशानंतर एकनाथ शंदे यांचे मुख्यमंत्री जाणार या चर्चांनी जोर धरला होता. मात्र त्या चर्चाच राहिल्या. आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत एका नेत्याचे नाव पुढे येत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतासाठी आज आनंदाचा क्षण आहे, चंद्रयान 3 चे चंद्रावर लँडिंग होणार आहे, भारतासाठी आज गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे हे आज सगळ्यांना दिसेल. वेगवेगळ्या मोहीमेतून इस्त्रोच्या माध्यमातून वेगवान वाटचाल वैज्ञानिक मनोवृत्ती दिसून येत आहे. सगळ्यांमध्ये उत्साह आहे म्हणून देशातील सर्व वैज्ञानिक यांचे अभिनंदन, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
गरज वाटल्यास जास्त कांदा खरेदी
राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पन्न होतो. कांदा हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कांदाचे उत्पादन शेतकरी घेत असतात. सरकारने कांदा निर्यात दर वाढवला तरी दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे, आज export करताना भाव मिळत नाही, त्यामुळे ऐतिहासिक भाव देण्याचा प्रयत्न केला. गरज वाटल्यास जास्त कांदा खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
अजित दादा वित्तमंत्री त्यांच्यावर विश्वास…
अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळे निर्णय घेण्याकॅहा त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. ते योग्य रीतीनेच निर्णय घेतील हा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यांच्यावर विश्वास असल्यामुळेच अनके पक्षाचे लोक आमच्या सोबत येत आहेत, आले आहेत. पक्षात येणाऱ्याची संख्या अधिक आहे, अजूनही काही जण इच्छुक आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना शुभेच्छा
आमच्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टी एकमेकांशी संवाद करून आम्ही निर्णय घेत असतो. यात उगाच वादावादी लावायचा प्रयत्न कुणी करत असतील तर ते चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खूप चांगली प्रगती झाली आहे, सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असे म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही, मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर त्यांच्यासह इतर अनेकांचा डोळा आहे. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.