मुंबईतून सर्वात मोठी बातमी ! पूनम महाजन यांचा पत्ता कट; उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार
भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकम यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे. या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्जवल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाजन यांचा पत्ताकट
भाजपकडून पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जात होतं. गेल्या काही महिन्यांपासून पूनम महाजन या मतदारसंघात सक्रियही झाल्या होत्या. पण त्यांचं तिकीट अचानक कापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांनी भाजपला राज्यात उभं केलं. भाजपला बहुजनांचा पक्ष बनवला. मात्र, आता भाजपने आधी प्रीतम मुंडे यांचा पत्ताकट केला. आता पूनम महाजन यांचा पत्ताकट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोण आहेत निकम?
उज्जवल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. निकम हे मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश होते. आई गृहिणी होती. बीएससी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनीही जळगावमधून कायद्याची पदवी घेतली. तिथल्या जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्य स्तरावरील केसेस लढण्यास सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील केसेसही हाताळण्यास सुरुवात केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम यांनी आतापर्यंत 628 हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचं काम केलं आहे. तर 37 आरोपींना मृत्यूची शिक्षा मिळवून दिली आहे. हायप्रोफाईल केसेस हाताळत असल्यामुळे त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. गुलशन कुमार मर्डर केस, प्रमोद महाजन मर्डर केस, 2013 तील मुंबई गँग रेप, मुंबईवरील हल्ल्याची केस आणि मुंबई बॉम्बस्फोटाची केस आदी महत्त्वाच्या केसेस ते लढलेले आहे.