आदेशाची वाट न पाहता आंदोलकांना अत्यावश्यक सेवा पुरावा, गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांकडे मागणी
पाऊस तसेच थंडीमध्ये हे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात मांडली. ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. पाऊस तसेच थंडीमध्ये हे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानामध्ये बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याची भूमिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात मांडली. तशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील केली आहे.ते आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सभेत बोलत होते.
सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत
“आझाद मैदानात बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही भूमिका मी आज माननीय उच्च न्यायालयात मांडली. त्यामुळे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची वाट न पाहता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत. लालपरीला दगड मारणारे हे सत्तेतील लोक असू शकतात आणि ही मंडळी या संपात फूट पाडू बघत आहे,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
आमचा पण दत्ता सामंत होईल असे म्हणतात
“शरद पवार विदर्भात गेले आणि म्हणाले हे नक्षलवादी आहेत. शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात. पवार मतासाठी पावसात भिजले. एवढे दिवस बोलले का शरद पवार ? शरद पवार मंत्री होते तेव्हा दत्ता सामंत यांना गोळ्या घातल्या गेल्या. आमचा पण दत्ता सामंत होईल असे म्हणतात. पण आम्ही कर्मचाऱ्यांसाठी लढणार,” असेदेखील सदावर्ते म्हणाले.
निलंबनाला घाबरायचे नाही
तसेच पुढे बोलताना पुढच्या 20 तारेखपर्यंत माघार घ्यायची नाही. 20 तारखेपर्यंत शुद्ध रहायचं असे मी तुमच्याकडून वचन घेतले आहे. निलंबनाला घाबरायचे नाही. मी लोकसभा किंवा विधानसभेतला नाही. पण हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात माझी चालते,” असे म्हणत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना माघार न घेण्याचा सल्ला दिला.
इतर बातम्या :
‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर
कोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचं आणखी एक ट्विट, म्हणाले ‘सत्यमेव जयते, लढा सुरुच राहणार’