पुण्यात 31 तारखेला क्रिकेट सामना असल्याने सरकार सावध, GBS बाबत मुख्यमंत्र्यांची तातडीने कॅबिनेट
तीन दिवसापेक्षा जास्त काळ आजाराची लक्षणे जाणवू लागली तर तात्काळ डॉक्टरांकडे जावे. याबाबत कोणीही काही लपवू नये. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहेत असे जिल्हाधिकाऱ्याने म्हटले आहे.

पुण्यातील जीबीएस आजाराने डोकेवर काढल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात या दुर्मिळ आजाराचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात आणीबाणी जाहीर झाली आहे. हा आजार दुर्मिळ असला तर संसर्गजन्य आजार नाही. या आजाराचे रुग्ण आता बरे होत आहेत. या आजाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेत केल्याने त्याचा लाभ रुग्णाला मिळणार आहे. या GBS आजारासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे.
जीबीएस हा संसर्गजन्य रोग नसल्याने काही चिंता करण्याची गरज नाही असे आरोग्यराज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. रविवारी पुण्यातील जीबीएस आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या 111 झाली आहे. त्यातील 80 रुग्ण 5 किमीच्या परिघातील आहेत. त्यामुळे पुण्यातील 35,000 घरांतील एकूण 94,000 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी पुण्यातील NIV राष्ट्रीय प्रयोगशाळेची मदत घेतली जात आहे. केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तोही GBS मुळेच झाला याची अजून पुष्टी झालेली नाही.
क्रिकेट सामना असल्याने काळजी
पुण्याला 31 जानेवारीला क्रिकेटचा सामना होणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याकडे लक्ष देण्यात यावे असे आदेश सरकारने दिले आहे. हा विकार पिण्याचे पाणी दूषित असेल किंवा न शिजवलेले अन्न किंवा मांस खाल्ल्याने होतो. त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा. पाणी उकळून प्या.तसेच या आजारामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनारोग्य योजनेत केला आहे, त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या या योजनेतून उपचार मिळणे शक्य होणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.




जीबीएस आजारा संदर्भात घ्यावयाच्या काळजी आणि इतर बाबींवर आज चर्चा झाली आहे. आजच्या बैठकीत सर्व विषयाची माहिती घेतली गेली आहे. 111 संशयित रुग्ण पुणे येथे आढळले आहेत. पाण्यामुळे हा आजार झाल्याचे म्हटले जात आहे. रुग्णासाठी जिल्हा रुग्णालयाने तयारी केली आहे. इतर औषधं सुद्धा आपण तयार केलेली आहेत. हा आजार काही नवीन नाही. हा आताचा आजार नाही.हा जुना आजार आहे. या आजाराबाबत आपण सर्व रुग्णालयांना सूचना दिलेल्या आहेत. आपण महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत चार लाखापर्यत मदत करू शकतो. त्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
जेथे टँकरने पाणी पुरविले जात आहे. तेथे पाण्याचा दर्जा तपासला जात आहे. योग्य मॉनिटरींग व्हावे असे आदेश दिले आहेत. आम्ही या आजाराबाबत योग्य पद्धतीने काम करत आहोत. पाण्याचे प्रदूषण ही महत्वपूर्ण समस्या आहे. पाण्याच्या वापराबाबत अजून जबाबदारीने ट्रेनिंग देणे महत्वाचं आहे. अनेक वर्षे हा आजार अस्तित्वात आहे. पुण्यात वाढलेल्या संख्येमुळे आता समोर आलाय. पेशन्टची संख्या वाढल्याने आपण जास्त काळजी करतोय असेही आबिटकर यांनी म्हटले आहे.
सोलापूरात जीबीएसने घबराट
सोलापूर जिल्ह्यात GBS चे 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र याबाबत नक्की हा आजार काय आहे त्याची माहिती सोलापूर मेडिकल कॉलेजचे डीन देतील असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटले आहे. GBS हा संसर्गजन्य रोग नाही त्यामुळे घाबरू नये. शरीरातील दूषित पेशी या शरीरातील अवयवांवर हल्ला करतात. गॅस्ट्रो, सर्दी आदी आजारा सारखा हा आजार आहे. यात पायात विकनेस येणे, पायातील चप्पल गळून पडणे, हातातील शक्ती जाणे, गिळायला त्रास होणे, दम लागणे, हाताला मुंग्या येणे आदी लक्षणे आहेत.
तीन दिवसापेक्षा जास्त काळ अशी लक्षणे जाणवू लागली तर तात्काळ डॉक्टरांकडे जावे. याबाबत कोणीही काही लपवू नये. आपल्याला जीबीएसची लक्षणे दिसल्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला 2 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. असे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी म्हटले आहे.