दिशा सालियन प्रकरणावर गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
दिशा सालियन प्रकरण हे पाच वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे तपासात जे व्हायचं असेल ते होईल. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर दिशा सालियन प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘या प्रकरणात तथ्य नाही. मात्र तुम्ही जर राजकारणासाठी हे प्रकरण चुकीच्या दिशेनं नेणार असाल तर सगळ्यांचीच पंचायत होईल, हे तुमच्यावरच बुमरँग होईल’ असा इशारा यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले पाटील?
दिशा सालियन प्रकरण हे पाच वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे तपासात जे व्हायचं असेल ते होईल. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर फारस बोलणं टाळलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आत्महत्याच्या विषयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शेतीची नापिकी, शेतकऱ्यांमध्ये असलेली निराशा असे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारणं आहेत. आत्महत्या होणे हेच चुकीचे आहे. आत्महत्या ही काही भूषणवाह बाब नाही. शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीला पूरक व्यवसाय सुरू केला पाहिजे, ती आजची गरज आहे. त्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दुय्यम शेती बचत गटांना प्रोत्साहन, यासारख्या योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत, शेतकऱ्यांना मदत केली जात आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
कुटुंब एका माणसावर अवलंबून असल्यास परिस्थिती किती वाईट होते, हे शेतकऱ्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय सुरू करता यावा यासाठी राज्य सरकारकडून मदत केली जात आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर येत्या सोमवारी बैठक घेणार आहोत असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.