परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणावरुन सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार परभणीत पोहचले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने शरद पवार यांनी सांगितले, मुलाला अटक केल्याचे मला पोलिसांनी सांगितले नाही. चार दिवस तो पोलीस कोठडीत होतो. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याला पोलीस जबाबदार आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस ठाण्यात कामावर असलेल्या सर्व दहा ते पंधरा जणांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरुन फाशीची शिक्षा द्या, असे त्यांना सांगितले.
सोमनाथ सूर्यवंशी याचा लहान भाऊ म्हणाला, माझ्या भावाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्हाला त्याचे पार्थिव देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मृतदेहावर एकही कापड नव्हते. त्यांना कोणाताही आजार नव्हता. पोलीस कोठडीत त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना वेगळ्या कोठडीत नेऊन मारहाण करण्यात आली. त्यांच्या मृतदेहावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. जे माझ्या भावासोबत घडले ते दुसऱ्या कोणाबद्दल घडू नये.
सोमनाथ यांचा लहान भावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे सांगितले ते खोटे असल्याचा दावा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांनी कोणत्याही पोलिसांना मारहाण केली नाही. तो आंदोलनात नव्हता. त्यासंदर्भातील व्हिडिओ असेल तर तो माध्यमांकडे उघड करा, असे आव्हान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने केले. फडणवीस साहेबांनी जी मदत जाहीर केली ते आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबाची म्हणणे ऐकल्यानंतर शरद पवार म्हणाले, कुटुंबाची भूमिका काय हे जाणून घेतल्यानंतर सरकारशी मला बोलता येईल. त्यासाठीत मी आलो आहे. घडलेली घटना गंभीर आहे. राज्य सरकारपर्यंत तुमच्या भावाना मांडू. दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबाची मागणी मी सरकारकडे मांडेल, असे शरद पवार यांनी म्हटले. पोलिस अत्याचारमध्ये मुलगा जाणे हे दुःख कमी नाही, असा दिलासा शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दिला.