उन्हाळ्याची चाहूल, बाजारात हापूस दाखल, देवगड आंब्याच्या पहिल्या पेटीला मिळाला उच्चांकी भाव
Hapus Mango Rate: फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. केवळ 30 टक्केच आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात हापूस उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

Hapus Mango Rate: उन्हाळ्याची चाहूल लागताच खव्वय्यांना हापूस आंब्याचे वेध लागतात. फेब्रुवारी, मार्चपासून बाजारात हापूस आंबे येण्यास सुरुवात होतात. परंतु सुरुवातीला हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे खव्वय्यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते. बाजारात हापूस आंबे आता दाखल होऊ लागले आहे. मुंबई, पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. त्याला उच्चांकी दर मिळाला होता. आता साताऱ्यात देवगड हापूस दाखल झाला आहे. त्याला बोलीत उच्चांकी दर मिळाला आहे.
पेटीला मिळाला 20 हजार रुपयांचा उच्चांकी भाव
साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटी दाखल झाली. या पेटीसाठी व्यापाऱ्यांनी बोली लावली. यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 20 हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली लावली. त्यानंतर देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतली. या बोलीनंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते.
यंदा उत्पादन कमी
यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. केवळ 30 टक्केच आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात हापूस उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.




सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे. खव्वय्यांसाठी आंब्याची चव यावर्षी महागणार आहे. मार्च महिना उजाडला तरीदेखील 1 डझन आंब्याची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर आला. मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहोराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन 2 ते 3 टक्केच झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहणार आहे. 15 एप्रिलनंतर हापूसचे दर कमी होण्याची शक्यता आहे.