VIDEO | धनंजय मुंडेंतर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणतात, सामाजिक मंत्र्यांचं भान…
"एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचं सोडून हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगतात, अशी टीका विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर केली
संभाजी मुंडे, टीव्ही9 मराठी, परळी, बीड : सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात दिवाळीत स्नेहमीलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Chaudhari) हिने ठुमके लगावले. या डान्सचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होत आहे.
काय म्हणाले विनायक मेटे?
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. “परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये सरकारी रुग्णालयात अकरा जणांचा दुर्दैवाने आक्रोश करत होरपळून मृत्यू झाला. या घटनेचं सावट असताना, शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाहीत. त्यांची उपाशीपोटी काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना पाहतात” असं विनायक मेटे म्हणाले.
“एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचं सोडून हे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगतात. सामाजिक खात्याचं सामाजिक भान सामाजिक मंत्र्यांनी राखायला हवं. बीड जिल्ह्यात खूप मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा कधीतरी आढावा पालकमंत्र्यांनी घ्यावा. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडपण्याचे प्रकार यामध्ये लक्ष घातलं तर बरं होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते असताना त्यांना सामाजिक भान होतं. मात्र आता त्यांचे सामाजिक भान हरवले आहे” अशी टीका विनायक मेटेंनी केली आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप
व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा