मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन दिवसात सुटणार? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं मोठं वक्तव्य
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीदेखील खालावत चालली आहे. तर दुसरीकडे मराठा कार्यकर्ते देखील आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. असं असताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
धाराशिव | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. तर राज्यभरात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मराठा आंदोलकांचा रोष पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या सोमवारी 30 ऑक्टोबरला मंत्रालयात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीने आतापर्यंत काय-काय कामे केली याचा आढावा घेतला जाणार आहे. असं असताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“मराठा आरक्षणाचा विषय येत्या 1-2 दिवसात सुटेल, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रातले नेते उपोषण आणि स्तिथीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. युद्ध पातळीवर यावर काम करत आहेत. कळकळीने ताकदीने काम केले जात आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काम करत आहे. निर्णय घेताना साधकबाधक चर्चा होत असते. केंद्र सरकारची मदत घेतली जाईल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार
दरम्यान, मराठवाड्यातील शिंदे गटाचे आमदार येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिवसेना आमदार ही भेट घेणार आहेत. आमदार संतोष बांगर यांनी याबाबत माहिती दिलीय. “मराठवाड्यातील शिवसेनेचे जे आमचे आमदार आहेत ते सोमवारी यवतमाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. एकनाथ शिंदे सोमवारी यवतमाळला येणार आहेत. आम्हीसुद्धा सर्वजण तिथे जाणार आहेत. मराठा आरक्षण आपल्या पदरात कसं पाडून घेता येईल, याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत”, असं संतोष बांगर यांनी सांगितलं.