महासंग्राम! शिंदे VS ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात उद्यापासून खरी लढाई, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या दुपारी तीन वाजता याबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या सुनावणीवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिलासा देते की शिंदे गटाला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत लाखो कागदपत्रे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्याची सुनावणी फार महत्त्वाची असणार आहे.
शिवसेना कुणाची, तसेच धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने संबंधित विषयाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला होता. त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली होती.
निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीपुरता ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं नाव मान्य केलं होतं. तसेच मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना पक्ष असं नाव मान्य करत ढाल-तलवार हे चिन्ह तात्पुरता स्वरुपात दिलं होतं.
आता निवडणूक आयोगाने दिलेले हेच नाव आणि चिन्हं कायम राहतील का की ठाकरे गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचबाबत उद्या महत्त्वाची सुनावणी सुरु होणार आहे. निवडणूक आयोगात उद्या सुरु होणारी सुनावणी ही ठाकरे आणि शिंदे गटासाठी खरी लढाई असणार असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगात उद्या होणाऱ्या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.