खबरदार, उष्णतेची लाट आहे, थंड पाणी पिताय? आधी वाचा, काय करावं, काय टाळावं?
उष्माघाताच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, किंवा छातीत दुखणे यांचा समावेश होतो.
मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश शहरांतील तापमानाचा (Temperature) पारा आता चाळीशीच्या पुढे गेलाय. राज्यात बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता नागपूर वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यानुसार खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आलाय. राज्यात 15 शहरं अशी आहेत, जेथील तापमान 40अंशांच्या पुढे गेलंय. राज्यात काही ठिकाणी कडक ऊन नसलं तरीही उष्ण लाटांनी नागरिक हैराण झालेत. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये नोंदलं गेलं. इथला पारा 43.6 अंशांवर पोहोचलाय तर नाशिकचं तापमान 39.1 अंश नोंदलं गेलं.
ढगाळ वातावरण अन् उष्णतेचीही लाट
राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर उष्णताही मोठ्या प्रमाणावर जाणवतेय. विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरु असून पुढील दोन दिवसात तापमानाचा पार घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, सोलापूर, बीड, जळगाव, मालेगाव, परभणी, नागपूर, जालना, गडचिरोली, नगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या शहरांतील तापमानाने चाळीशी पार केली आहे.
उष्णतेच्या लाटेत काय खबरदारी घ्याल?
- वातावरणातील तापमान वाढल्यामुळे अनेकदा आपण थंड पाणी पिणे, किंवा थंड पदार्थ खातो. पण यावेळी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे.
- तापमान 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असताता. कारण असे केल्यास रक्तवाहिन्यांना इजा पोहोचू शकते.
- खूप उन्हातून आपण घरी येतो. घाम आलेला असतो. शरीराचं तापमानही वाढून गेलेलं असतं, अशा वेळी पटकन् थंड होण्याचा प्रय्तन करतो. त्यासाठी थंड पाण्याने पाय धुणे, फॅनची स्पीड वाढवणे, कुलरसमोर बसणे, थंड पाणी पिणे, अशा गोष्टी केल्या जातात. मात्र यामुळे उष्माघात होऊ शकतो. बाहेरून आल्यावर किमान अर्धातास या गोष्टी करणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात.
- घराबाहेरचं तापमान जेव्हा 38 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते तेव्हा घरी आल्यावर ताबडतोबत थंड पाणी पिऊ नये. आधी खोलीच्या तापमानाचंच पाणी प्यावं, तेसुद्धा अगदी हळू हळू.. असा सल्ला डॉक्टर देतात.
- बाहेरच्या कडक उन्हातून आल्यावर थेट थंड पाण्याने हाय-पाय धुवू नका. अर्धा तास खोलीतल्या वातावरणातच तसेच बसा. नंतर हळू हळू थंड पाण्याने पाय धुवा.
उष्माघात म्हणजे नेमकं काय?
नवी मुंबई परिसरातील खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा बळी गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर उष्णतेच्या लाटेपासून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात येत आहे. उष्माघातात शरीर जास्तीत जास्त तापमान शोषून घेते. शरीराचे तापमान जास्त वाढते तेव्हा स्ट्रोक म्हणजेच मेंदूची रक्तवाहिनी फुटते किंवा गुठळ्यांमुळे रक्तप्रवाह ब्लॉक होतात. उष्माघात झाल्यानंतर तत्काळ उपचार मिळाले नाही तर मृत्यूची शक्यता ओढवते.
लक्षणं काय?
उष्माघाताच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे, किंवा छातीत दुखणे यांचा समावेश होतो.