नाशिकवरून पुन्हा खलबतं, दोन नेते मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलं; काय निर्णय होणार?
महायुतीतील जागा वाटपाचा जागा अजूनही सुटलेला नाही. काही जागांचा तिढा मार्गी लागला आहे तर काही जागांवरून अजूनही पेच कायम आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. ही जागा राखण्यात शिंदे गटाला यश आलं आहे. पण नाशिकची जागा शिंदे गटाच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा टेन्शन आलं आहे.
नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा गटाने नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. नाशिकच्या जागेसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, असा दावा अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमधून पत्ता कट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नाशिकची सीट मिळावी म्हणून हेमंत गोडसे यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. आधी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा हेमंत गोडसे यांना भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे या भेटीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतलं आहे. तातडीने मुंबईला या असा निरोप मिळाल्यानंतर गोडसे हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलपही आहेत. हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार असून मुख्यमंत्र्यांशी नाशिकच्या जागेवरून चर्चा करणार आहेत. त्यामुळे नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळणार का? की हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात याबाबतचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
घोलप यांचं वजन पडणार?
दरम्यान, बबनराव घोलप हे सुद्धा गोडसे यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाले आहेत. गोडसे यांना तिकीट द्यावं म्हणून घोलप हे मुख्यमंत्र्यांचं मन वळवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे घोलप यांच्याही प्रयत्नांना यश येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भुजबळ निवडणुकीच्या मैदानात
दरम्यान, छगन भुजबळ यांनी आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिकची निवडणूक लढवण्याचं माझ्या ध्यानीमनी नव्हतं. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेत माझं नाव समोर आलं. त्यामुळे मी लढायला तयार आहे. नाशिकच्या जनतेची जी इच्छा असेल तेच होईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
घोलप शिवसेनेत प्रवेश करणार
दरन्यान, बबन घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. घोलप हे हेमंत गोडसे यांच्यासोबत मुंबईला यायला निघाले आहेत. मुंबईत आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोलप हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वर्षावर होणार मायक्रो प्लानिंग
दरम्यान, वर्षा निवासस्थानी आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. या बैठकीला शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, संदिपान भूमरे, दादा भूसे, अर्जून खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट इतर नेते उपस्थित आहेत. काही वेळातच बैठक सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांचं म्हणणं ऐकून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे. या बैठकीत निवडणुकीचं मायक्रो प्लानिंग होणार आहे. आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, विकास कामं घेऊन मतदारांकडे जा, असा आदेश मुख्यमंत्री देणार असल्याचं सांगितलं जात आहे.