Santosh Bangar | हिंगोली ते मुंबई, 700 किमी अंतर, हजारो शिवसैनिक, 50 गाड्या, आमदार संतोष बांगर यांचं शक्तिप्रदर्शन
मुसळधार पाऊस, पूरस्थिती असतानाही हिंगोली ते मुंबई 700 किलोमीटरचा प्रवास करून आपण आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे अभिनंदन....
मुंबईः मलाच काय तर तालुका प्रमुखांनाही पदावरून हटवण्याचा अधिकार कुणाला नाही, अशी आक्रमक भूमिका घेणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी आज हिंगोली (Hingoli) ते मुंबई असा 700 किलोमीटरचा मोठा प्रवास करत मुख्यमंत्री निवासस्थान गाठले आहे. हिंगोली ते मुंबई या मार्गावरून शेकडो शिवसैनिकांची रॅली घेऊन त्यांनी प्रवास केला. यावेळी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नावाने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला गेलेल्या आमदारांमध्ये संतोष बांगर यांचा समावेश नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी मी निष्ठावान असून बंडखोर आमदरांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीदरम्यान संतोष बांगर यांनी शिंदे गटात शामिल होण्याची इच्छा बोलून दाखवली आणि शिंदेंच्या बाजूने मतदानही केलं. त्यानंतर हिंगोलीत परत गेल्यावर त्यांनी त्यांच्या संपूर्ण बंडामागील कारणं सांगितली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रवासात शिवसेनेचं मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण सांगितलं…
हिंगोलीतील नगरसेवक, जिल्हा शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, पंचायत समिती सदस्य तसेच सामान्य शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. जो हिंदु हित की बात करेगा… त्याच्या दर्शनासाठी मुंबईत यायचं.. असा आग्रह शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. एकनाथ शिंदेंची भेट घ्यायची, विनंती शिवसैनिकांनी केली होती. त्यामुळे इथपर्यंत तुमच्या भेटीसाठी आलो, अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून बांगर यांचं विशेष कौतुक…
हिंगोली ते मुंबई असा प्रवास करून आलेल्या आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ मुसळधार पाऊस, पूरस्थिती असतानाही हिंगोली ते मुंबई 700 किलोमीटरचा प्रवास करून आपण आल्याबद्दल शिवसैनिकांचे अभिनंदन…. ते म्हणाले, संतोष बांगर यांचे पद आणि ताकद विशेष सांगायची गरज नाही. हिंगोली मतदारसंघातील ते लोकप्रिय आमदार आहेत. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार तुम्ही विधानसभेत पाठवल्याबद्दल शिवसैनिकांचे मी आभार मानतो. गेल्या महिनाभरात घडामोडी पाहात असताना आमचा प्रवासही तुम्ही पाहिला. पण मला अभिमान वाटतो, की तुमच्या एकनाथ शिंदे आणि 50 आमदारांची दखल राज्यात, देशात नाही तर जगाने घेतली आहे. हिंदुत्व, बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे नेण्याचे प्रयत्न आपण करत आहोत. लोकांच्या मनातलं, सर्वसामान्यांचं, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं आहे. जी भूमिका घेतली, त्याचं समर्थन राज्यातल्या सर्वसामान्य लोकांनी केलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जालन्यात बांगर यांचा सत्कार
हिंगोली ते मुंबई मार्गात जवळपास 50 ते 55 गाड्यांचा ताफा आमदार संतोष बांगर यांच्यासोबत होता. सोमवारी रात्री जालन्यात राम नगर येथे बांगर यांचा ताफा पोहोचताच सामाजिक कार्यकर्ते रमेश यज्ञनेकर यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार बांगर यांना राजस्थानी पगडी बांधून सत्कार केला..