भारत जोडो यात्रेत सहभाग का, आदित्य ठाकरे यांनी स्पष्टचं सांगितलं
ज्यांनी पीडीपीसोबत युती केली त्यांनी हिंदुत्वाबद्दल कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.
हिंगोली : हिंगोली येथे भारत जोडो यात्रा पोहचली. राहुल गांधी यांनी ही भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेत आज आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, भारत जोडो यात्रा काल नांदेड येथे पोहोचली. काल राष्ट्रवादी काँग्रेस या यात्रेत सहभागी झाली होती. शिवसेनाही या यात्रेत सोबत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत. तरीही संविधानासाठी, लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत. ही लोकशाही देशात चिरडली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
सत्ताधाऱ्यांनी स्वताचा इमान विकला आहे. त्यांना बोलायचा अधिकार नाही. आम्ही पीडीपीसोबत गेलो नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला. आता आम्ही लोकशाही आणि संविधानासाठी एकत्र आलो आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्यांनी पीडीपीसोबत युती केली त्यांनी हिंदुत्वाबद्दल कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. जेजुरीच्या आराखड्याला स्थगिती दिली आहे. तिरुपतीच्या मंदिराला स्थगिती दिली आहे. अशा सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये. ज्या गद्दारांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक चालविली त्यांनी हिंदुत्वाबद्द्ल बोलू नये, असंही आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहचली. नांदेडमध्ये काल जोरदार स्वागत करण्यात आलं. आज ही यात्रा हिंगोलीत पोहचली. या यात्रेस आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.