बैलगाडा शर्यतीवर बंदी तरीही पठ्ठ्याने सांभाळले 32 बैलं, बंदी उठताच केला जल्लोष; हिंगोलीच्या शेतकऱ्याची कथाच न्यारी
राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय. हिंगोली जिल्ह्यातील एका बैलगाडा मालकाला या निर्णयाचा इतका आनंद झाला की त्याने गोडधाेड वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
हिंगोली: राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय. हिंगोली जिल्ह्यातील एका बैलगाडा मालकाला या निर्णयाचा इतका आनंद झाला की, त्याने गोडधाेड वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. बबन भगत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला कारणही तसेच आहे. बबन यांनी आपली संपूर्ण हयात बैलगाडा शर्यतीसाठी खर्ची घातली आहे. शंकरपटावर बंदी असतानाही या अवलीयाने शर्यतीच्या तब्बल 32 बैलांचा सांभाळ केला आहे. त्यामुळे बदी उठली म्हटल्यावर आनंद तर होणारच ना.
‘अशी’ झाली सुरुवात
हिंगोलीच्या पिंपळदरी येथील अल्पभूधारक शेतकरी बबन भगत यांनी एका यात्रेत शंकरपट ( बैलगाडा शर्यत) बघितली होती. ही शर्यत बघून आपनही आपले बैल शंकरपटासाठी तयार करावेत असे त्यांना वाटले. त्यांनी हा निर्णय आपल्या कुटुंबीयांना बोलून दाखवला, मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडून या गोष्टीला विरोध झाला. पुढे हातोडा नावाच्या अवघ्या नऊ महिन्याच्या वासरामध्ये त्यांना बैलगाडा शर्यतीचे सर्व गुण दिसून आले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
हातोडा, प्रेम चोपडाने गाजावली मैदाने
त्यांच्या हातोडा आणि प्रेम चोपडा या बैलजोडीने शंकरपटात सारा महाराष्ट्र गाजवला, स्वतः अडचणीत असतांना बबन यांनी या बैलांची मात्र जीवापाड काळजी घेतली, रोज बादाम, 10 लिटर दुध, कणीक असा आहार ते स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन बैलांना देत असत. या बैलजोडीने देखील मालकाची उतराई म्हणून 150 पेक्षा अधिक मैदानं गाजवली. मालकाला लाखो रुपयांचे बक्षीस मिळून दिले. त्यातील हातोडा या बैलाला तर 2014 मध्ये सात लाख रुपयांना मागण्यात आले होते. मात्र तरी देखील बबन यांनी आपला बैल विकला नाही. पुढे शंकरपटावर बंदी आली आणि सर्वच गाडे बिघडले. त्यांना बैलांचा खर्च करणेही परवडत नव्हते, मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता नेटाने बैलांचा सांभाळ केला. एक दिवस शंकर पटावरील बंदी नक्की उठेल अशी त्यांना आशा होती. यातूनच त्यांनी तब्बल 32 बैलांचा सांभाळ केला. आज बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्याने बबन यांचा आनंद गगनात मावत नाहीये. बबन यांच्याकडे सध्या स्थितीमध्ये लहान, मोठी अशी एकूण 55 जनावरे असून, ते त्यांची आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात.
संबंधित बातम्या
निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला