संतोष बांगर यांच्या हिंगोलीत काय घडतंय? बाजार समिती निवडणुकीत कुठे कुठे महाविकास आघाडी फुटली? बांगर यांचं वर्चस्व कायम राहणार?
संतोष बांगर यांच्या बंडामुळेही हिंगोलीतील निवडणुकांकडे विशेष लक्ष आहे. उद्धव ठाकरेंशी बंडखोरी केल्यानंतर बांगर यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रथमच नशीब आजमावत आहेत.
रमेश चेंडके, हिंगोली : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांच्या (APMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वात मोठी समजली जाते. या निवडणुकीत दोन माजी मंत्र्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत 18 संचालक पदासाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत.
वसमतमध्ये काय घडलं?
काही महिन्यांपूर्वीच वसमत येथील मार्केट कमिटीची निवडणूक विधानसभेच्या निवडणूकीपेक्षाही रंगतदार झाली होती. त्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेससह महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते. त्याचा राग मनात धरुन ह्या निवडणूकीत महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी फूट पडल्याचं बघायला मिळत आहे. त्यावेळीसुद्धा काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याने महाविकास आघाडीत फूट पडली होती. तशीच फूट आता जवळा बाजार सह इतर ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणूकीत पडलेली दिसत आहे. ह्या ठिकाणीसुद्धा काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याचं बोलल जात आहे..
काँग्रेसचा हात शिवसेना भाजपला साथ.?
आता जवळा बाजार मार्केट कमिटीच्या निवडणूकीत काँग्रेसचा एकही पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी सोबत नाही. काही महिन्यांपूर्वी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे औंढा तालुका अध्यक्ष अंकुश आहेर यांनी माजी मंत्री डॉ जय प्रकाश मुंदडा यांच्या अडमुठ्या धोरणाला कंटाळून (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून भाजपा नेते बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
आता आहेर यांच्या भाजपा प्रवेशाने मार्केट कमिटी निवडणूकीत भाजपला किती फायदा होणार, हे बघणे तितकेच गरजेचे आहे. ह्या निवडणूकीत जर फायदा झाला तर येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत त्या परिसरात महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही..
हिंगोली बाजारसमितीत काय चित्र?
हिंगोली बाजार समितीत बिनविरोधचा डाव फसला. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला बाहेर फेकल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ह्या ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याने युती फायद्यात राहणार आहे. त्यातही युतीचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे.
हिंगोली बाजार समितीसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत . भाजप शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस यांचा एक पॅनल.तर राष्ट्रवादीने त्यातील एकदोन नाराज असणाऱ्यांना सोबत घेऊन वेगळा पॅनल केला आहे.तर काहींनी अपक्षचा झेंडा हाती घेतला असल्याने ह्या ठिकाणी चुरस वाढणार आहे..
सेनगावमध्येही आघाडीत बिघाडी
सेनगाव येथेही राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर दिसतोय. भाजप ,काँग्रेस व शिवसेना विरुद्ध सरपंच युनियन व शेतकरी संघटना असा सामना रंगणार आहे.
कळमनुरीत 17 जागांसाठी 34 उमेदवार
कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना व भाजप युती अशी सरळ लढत आहे. आमदार संतोष बांगर यांचे होम ग्राउंड असल्याने या मार्केट कमिटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.