‘जेसीबी आमच्या, भाडे आमचे, तुम्हाला काय XXX होत नाही का?’, जरांगेंचा घणाघात
मनोज जरांगे यांचं स्वागत करताना जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव केला जातो. यावरुन काही जण टीका करतात. पण याच टीकेला आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
संजय सरोदे, Tv9 प्रतिनिधी, हिंगोली | 12 मार्च 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी मराठा आंदोलनासाठी होणाऱ्या खर्चावरुन टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. “जेसीबी आमच्या, भाडे आमचे, तुम्हाला काय XXX होत नाही का? आमच्या घामाचे पैसे आहेत. फडवणीस साहेब, मध्ये जायला भीत नाही. वाघाचे काळीज लागते. आमच्या मराठ्यांचे लोक संरक्षण करायला तयार आहेत. पॉलिसीची गरज नाही. मराठा आरक्षणबद्दल बोलणाऱ्याला मी सोडत नाही. न टिकणारे आरक्षण मी घेत नाही, समाजाशी गद्दारी करू शकत नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सात महिने झाले संघर्ष सुरू आहे. सरकार जाणूनबुजून 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देत आहे. मी पण मांडलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कितीही अन्याय केला तरी आरक्षण मिळवणार. माझ्या विरोधात एसआयटी नेमली. मी भ्यायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या 10 पिढ्या गेल्या तरी मी हटत नाही. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर किती दिवस करतात ते बघू. मराठ्यांनी पुन्हा ताकतीने एकत्र यायचे आहे. मी त्यांना पुरून उरतो. एव्हडी शक्ती तुम्ही दिली. मला आरे तुरे बोलू नको म्हणून मला देवेंद्र फडवणीस निरोप पाठवत आहे”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
‘मी जेलमध्ये जायला तयार’
“तुम्ही दिलेलं 10 टक्के आरक्षण घेत नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे. मी भ्रष्टाचार केले नाही. मी क्षत्रिय मराठा आहे. आम्हाला लढायचं माहीत आहे. मी मारणार नाही तर आरक्षणाचा गंध लावून येणार. जे 10 टक्के आरक्षण टिकणार नाही, ते समजाला मान्य नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटत नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.