हिंगोली नगर पालिकेचा नवा फंडा, लस घेणाऱ्यांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीसं! टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनही जिंकण्याची संधी!
हिंगोलीत लसीकरण आणि आरटीपीसीआर टेस्ट मोहिमेला अधिक गतिमान करण्यासाठी हिंगोली नगर पालिकेने एक फंडा काढलाय. लस घेणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ द्वारे विविध बक्षीसे दिली जाणार आहेत.
हिंगोलीः ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातल्याने आणि भारतातही आता याचा शिरकाव झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली (Hingoli) जिल्हा प्रशासन चांगलंच सतर्क झालंय. आता पर्यंत जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 65 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 32 टक्के एवढी झाली आहे. करोनाच्या (Corona wave) तिसऱ्या लाटेला थोपता यावे व लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी लस घेणाऱ्यांसाठी नगर परिषदेतर्फे लकी ड्रॉ द्वारे विविध बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
लसीकरणाला प्रोत्साहन, लकी ड्रॉचा फंडा
हिंगोली जिल्ह्यात लसीकरण आणि आरटीपीसीआर टेस्ट मोहिमेला अधिक गतिमान करण्यासाठी हिंगोली नगर पालिकेने एक फंडा काढलाय. लस घेणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ द्वारे विविध बक्षीसे दिली जाणार आहेत. हिंगोली नगरपालिकेनं हा आगळा वेगळा उपाय राबवला आहे. लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लकी ड्रॉची योजना राबवली आहे. या योजनेत पहिले बक्षीस ५० इंची टीव्ही, दुसरे वॉशिंग मशीन, तिसरे फ्रिज,मिक्सर कुकर अशी विविध बक्षीसे विजेत्यांना मिळणार आहेत. नागरिकांना लस देतानाच त्यांच्याकडून लकी ड्रॉचे फार्म भरून घेतले जात आहेत. एका लहान बाळाच्या हताने चिठ्या टाकून या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. या ऑफरचे बॅनर सुध्दा शहरात लावले आहेत. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ही शक्कल नगरपालिकेने लढवली आहे. यामुळे ऑफरमुळे नागरिक ही मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.
लस घेणाऱ्यांनाच पेट्रोलची परवानगी
या शिवाय लसीकरण करणाऱ्यांना नागरिकांनाच पेट्रोल डिझेल मिळणार आहे. करोनासंबंधी घालून दिलेले नियम कोणी पाळत नसेल तर त्यास 500 रूपये दंड अकारण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. सध्या पेट्रोल पंप, लसीकरण केंद्र अदी ठिकाणी लस दिली जात आहे. त्याचं बरोबर आरटीपीसी-आर,अँटीजन टेस्टचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आता प्रशासनानंही कंबर कसली आहे. तसेच कोणत्याही ठिकाणी अनावश्यक गर्दीचे कार्यक्रम घेऊ नये, सभागृहात पन्नास टक्के उपस्थितीत कार्यक्रम घ्यावेत. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना करोना चाचणी करून जावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
इतर बातम्या-