आता डिस्चार्जआधीच रुग्णालयाच्या बिलांचे लेखा परीक्षण, नवी मुंबई महापालिकेत कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष
रुग्णालयांकडून कोव्हिड-19 विषयक उपचारांदरम्यान आकारण्यात येणाऱ्या बिलांबात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड-19
हर्षल भदाने पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : खासगी रुग्णालयांकडून कोव्हिड-19 विषयक उपचारांदरम्यान आकारण्यात येणाऱ्या बिलांबात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre) कार्यन्वित केला आहे. या तक्रार निवारण कक्षात प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक घेऊन त्याची पडताळणी केली जात आहे. (Hospital bills will be audited before discharge, Covid-19 Bill Grievance Redressal Room in Navi Mumbai Municipal Corporation)
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे आणि रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळावा यासाठी आज याबाबतचा आढावा घेतला. रूग्णालयामार्फत डिस्चार्जपूर्वी देण्यात येणाऱ्या संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण त्याच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने कोव्हिड-19 वर उपचार करणाऱ्या रुग्णालयामध्ये महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश दिले. याप्रसंगी समितीच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड, समितीचे नियंत्रण अधिकारी राजेश कानडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे उपस्थित होते.
15 मे रोजी याबाबतच्या विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी 1 एप्रिलपासून खासगी रुग्णालयांमधील देयकांचे लेखा परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. सदर कार्यवाही सुरु असून त्याबाबतचा आढावा आयुक्तांनी आजच्या बैठकीत घेतला. त्याचप्रमाणे रुग्णालयांकडून डिस्चार्जपूर्वी 48 तास आधी संभाव्य देयक मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी रुग्णालयांमध्येच महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.
देयकांच्या पोस्ट ऑडिटपेक्षा प्री ऑडिट करणे रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या दृष्टीने आर्थिक हिताचे आणि सुविधेचे आहे हे लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये देयकांच्या लेखा परीक्षणासाठी अधिकारी नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नियुक्त अधिकाऱ्याने देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतरच रुग्णाच्या नातेवाईकांनी देयक अदा करावयाचे आहे. त्यास अनुसरून रुग्णालयांची बेड्स क्षमता लक्षात घेऊन तेवढ्या संख्येने अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हिड-19 रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणी करताना कोव्हिडपश्चात निदान होणाऱ्या म्युकरमायकोसिस वरील उपचारांचीही देयके तपासावी, असेही आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसचे उपचार हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्येच होऊ शकतात, हे लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा असणाऱ्या रुग्णालयांनीच म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी दाखल करून घ्यावेत, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
रुग्ण सुविधांचे दर निश्चित
खासगी कोव्हिड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 21 मे 2020 आणि 30 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार कोव्हिड-19 संसर्ग बाधित रूग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या बॉम्बे नर्सिंग होम (अमेन्डमेंट) ॲक्ट 2006 नुसार नोंदणीकृत ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज) यांना मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्ण सुविधांचे दर निश्चित केलेले आहेत.
संपर्क कुठे करायचा?
त्यानुसार देयके आकारणे रुग्णालयांना बंधनकारक असून त्याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘कोव्हिड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)’ येथे 022-27567389 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर तक्रार दाखल करावयाची असल्यास cbcc@nmmconline.com या ई मेल आयडीवर अथवा 7208490010 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठवाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर बातम्या
कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी; हायकोर्टाने खडसावलं
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा किंचीत वाढ, कोरोनाबळी मात्र घटले
(Hospital bills will be audited before discharge, Covid-19 Bill Grievance Redressal Room in Navi Mumbai Municipal Corporation)