सुंदरी हसली, लालपरी रुसली ! एसटी गाड्यांच्या देखभालीकडेही लक्ष द्या
मुंबई-पुणे शिवनेरी बसमध्ये आता विमानातल्या हवाईसुंदरींप्रमाणेच शिवनेरीतही सुंदरी नेमण्याचा निर्णय झालाय. यावरुन मात्र सुंदरी नेमण्याबरोबर लालपरीची स्थिती कधी सुधारणार,. असाही प्रश्न विचारला जातो आहे.
विमानातल्या हवाईसुंदरींप्रमाणे आता एसटी महामंडळच्या शिवनेरी गाड्यांमध्येही सुंदरी असणार आहेत. नवनियुक्त एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे धावणाऱ्या शिवनेरी बसमध्ये या सुंदरी असतील. प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणी, येणाऱ्या थांब्याची माहिती असा विविध गोष्टींची जबाबदारी सुंदरींना दिली जाईल. मात्र या निर्णयावर टीका होते आहे. कारण विमानाला आकाशात थांबे नसतात. विमान प्रवासात जेवणासह नाश्ता दिला जातो. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर माहिती देणारे लोक लागतात. टेकऑफ-लँडिंगवेळी सीटबेल्ट बांधण्यापासून अनेक सूचना दिल्या जातात. त्यासाठी विमानात हवाईसुंदरींची जबाबदारी येते.
मात्र एसटी महामंडळाची शिवनेरी बसला अनेक थांबे आहेत. नाश्ता वा जेवणासाठी बस थांबवली जाते. ऑक्सिजन पातळी वा सीटबेल्टचा विषयच येत नाही. त्यामुळे बसमध्ये सुंदरी नियुक्ती करण्याऐवजी बस-कंडक्टर हेच खरे महामंडळाचे सुंदरी आहेत, त्याऐवजी लालपरीच्या सुंदरतेकडे लक्ष द्या., अशी मागणी केली जाते आहे.
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना जवळपास २ वर्षांपासून मंत्रीपदासाठी वेटिंग लिस्टवर होते. मात्र पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लावली गेली. आणि मंत्रीपदाचा दर्जाही दिला गेला. 20 सप्टेंबर रोजी गोगावलेंची एसटी महामंडळ अध्यक्षपदी निवड झाली. आणि साधारण येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. म्हणजे महामंडळ अध्यक्ष म्हणून गोगावलेंना पदभार ग्रहणाचा दिवस जोडून जेमतेम 20 दिवस मिळाले आहेत. त्यात पहिल्याच बैठकीत ७० हून अधिक मुद्द्यांवर चर्चा करुन त्यांना गोगावलेंनी मंजुरी दिलीय. त्यापैकीच एक निर्णय हा शिवनेरी बसमध्ये सुंदरीला नियुक्त करण्याचा आहे.
प्रवाशीसंख्या वाढून प्रवास सुखकर होऊ लागल्यास असे निर्णय योग्य ठरतील. पण महामंडळाच्या बड्या लक्जरीयस गाड्यांमध्ये सुंदरी नेमून महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या एसटी गाड्यांच्या देखभालीकडेही लक्ष देणंही गरजेचं आहे. कारण, जिला आधी लालपरी म्हटलं जातं होतं., तिची ओळख आता लालडबा बोऊन बसलीय. म्हणून शिवनेरीतल्या सुंदरीबरोबरच दुर्लक्षानं रुसलेल्या लालपरीसाठीही अशाच निर्णयांची अपेक्षा आहे.