Haryana Result Impact on Maharashtra : हरियाणाच्या निकालामुळे महाराष्ट्रात काँग्रेस काय-काय गमावणार?
Haryana Result Impact on Maharashtra : काल हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हा निकाल काँग्रेससाठी धक्का मानला जातोय. कारण या निकालाचे पडसाद फक्त हरियाणापुरता मर्यादीत राहणार नाहीयत. लवकरच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. तिथे या निवडणूक निकालाचे काय परिणाम दिसून येणार ते जाणून घ्या.
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाने काल काँग्रेसला मोठा धक्का दिला. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधातील लाटेमुळे सहज सत्तेत परतण्याच स्वप्न बघणाऱ्या काँग्रेसचा भ्रमनिरास झाला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 48 जागा जिंकल्या आहेत. त्यांचा सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. त्यांना अपक्षांची सुद्धा मदत घेण्याची गरज नाहीय. या विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद काँग्रेससाठी फक्त एका राज्यापुरता मर्यादीत राहणार नाहीयत. काँग्रेसला झारखंड, महाराष्ट्र आणि 10 जागांसाठी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीतही त्याची किंमत चुकवावी लागेल. आता लवकरच झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. कालपर्यंत तिकीट वाटपात वर्चस्व दाखवणाऱ्या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर आता कमी झाली आहे.
हरियाणातील काँग्रेसच्या पराभवावर सर्वप्रथम शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसचा जिथे थेट भाजपाशी सामना असतो, तिथे काँग्रेस कमकुवत पडते. त्यांना आपल्या रणनितीकडे लक्ष द्यावे लागेल” असं ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. काँग्रेस थेट सामन्यात भाजपाला पराभूत करु शकत नाही. काँग्रेसला भाजपाला हरवण्यासाठी मित्र पक्षांची गरज लागते, असं त्या इशाऱ्या, इशाऱ्यांमध्ये बोलून गेल्या. प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसबद्दल असं का बोलल्या? या प्रश्नाच उत्तर काँग्रेसकडून महाराष्ट्रात विधानसभेसाठी जागांची जी मागणी केली जातेय, त्यामध्ये आहे.
हरियाणाच्या निकालामुळे काँग्रेसने काय-काय गमावलं?
चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले. या निकालानुसार महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मविआचा भाग असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्रात 13 खासदार निवडून आले. 2019 मध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला होता. महाराष्ट्रात खासदारांची संख्या वाढल्याने काँग्रेसचे आमदार निवडून येण्याची शक्यता सुद्धा बळावली. विधानसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये तिकीट वाटपात काँग्रेसचा वरचष्मा राहणार असं दिसत होतं. पण हरियाणाच्या निकालाने चित्र पालटलं आहे. काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. मविआमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट तिकीट वाटपात आपली बाजू सुद्धा तितकीच ताकदीने मांडतील.
मविआमध्ये मतभेद कशावरुन?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन सुद्धा मतभेद आहेत. मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आपण त्याचा प्रचार करु अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मागणीसाठी अनुकूल नाहीत. निकालानंतर बघू अशी त्यांची भूमिका आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरुन सुद्धा भाष्य केलं होतं. आता हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी 125 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या.