दोन्ही गटाचे आमदार पात्र कसे?; राहुल नार्वेकर यांचा सर्वात मोठा खुलासा काय?
दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आणि निकाल अपात्र झाला अशी टीका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर होत आहे. याच संदर्भात उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले, शिंदे यांचाही रोष आमच्यावर आहे आणि ठाकरे यांचाही रोष आमच्यावर आहे. पण, कुणाच्याही रोषाला घाबरून आम्ही निर्णय देत नाही असे म्हटले.
मुंबई | 11 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदार अपात्र प्रकरणी शिंदे गटाच्या आमदारांना क्लीनचीट देत ते पात्र असल्याचे जाहीर केले. मात्र, त्याचवेळी अध्यक्ष यांनी ठकारे गटाच्या आमदार यांनाही पत्र ठरवले. हा निर्णय का घेतला आणि कोणत्या निकषांचा आधार घेऊन दिला याचे खुलासेवार स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखत दरम्यान दिले.
दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आणि निकाल अपात्र झाला अशी टीका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर होत आहे. याच संदर्भात उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले, शिंदे यांचाही रोष आमच्यावर आहे आणि ठाकरे यांचाही रोष आमच्यावर आहे. पण, कुणाच्याही रोषाला घाबरून आम्ही निर्णय देत नाही. संविधानाच्या निर्णयानुसार आम्ही निर्णय घेतो. कायद्यात अपात्रतेसंबंधित ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यानुसार आम्ही निर्णय देतो. त्यामुळे कुणाला वाईट वाटतं, कुणाला काय वाटतं. त्याच्याशी आमचा संबंध नाही असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
आम्हाला कायद्याला पुढे न्यायचं आहे. सामान्य लोकांचा संसंदीय लोकशाहीवरचा विश्वास वाढावा हे काम करायचं आहे. त्यामुळे बाहेर लोक काय बोलतात हा विचार करून निर्णय दिला तर मला न्यायबुद्धीने निकाल देताच येणार नाही. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.’ असं केलं तरी बोलणार आणि तसं केलं तरी बोलणारच. लोक काय बोलतात याचा विचार करून न्यायाधीशाच्या भूमिकेत निर्णय घेऊ शकत नाही असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
हे ही पात्र, ते ही पात्र असा निकाल
जेव्हा आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतो तेव्हा दोन तीन गोष्टीवर विचार करावा लागतो. आमदार अपात्र कधी होतो? त्याने २ (१ ए) खाली स्वतःहून आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला असेल तर आणि दुसरे २ (१ बी ) खाली जर पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर तो अपात्र ठरतो.
अपात्र होण्यासाठी तीन गोष्टी पाहाव्या लागतात. ज्याने व्हीप दिला त्याला तो जारी करण्याचा अधिकार होता का? त्याने खरोखरच व्हीप जारी केला का? तो व्हीप जारी केल्यानंतर तो संबंधित आमदारांवर बजावला होता का? मी व्हीप इश्यू केला आणि खिशात ठेवला तर समजणार कसं? या केसमध्ये भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी दिलेला व्हीप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना बजावला याचा पुरावा सादर केला नाही. क्रॉस चौकशीत असे सिद्ध झालं की त्यांनी तो व्हीप योग्यरित्या बजावला नाही. ठाकरे गटाचंही तेच म्हणणं होतं. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला शिंदे गटाचा व्हीप लागू होत नाही, असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. त्यांचं तसं म्हणणं होतं आणि यांचं म्हणणं होतं की त्यांचा व्हीप मान्य होत नाही. कोर्टाने मला सांगितलं की हे तुम्ही ठरवा. राजकीय पक्ष कुणाचा होता हे ठरवलं. राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार तो व्हीप मान्य केला. पण, व्हीप आमदारांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यांनी नैसर्गिक न्यायाची प्रक्रियाच फॉलो केली नाही. मी व्हीप बजावला आणि खिशात ठेवला. तो तुम्हाला दिलाच नाही आणि तुम्हाला अपात्र ठरवलं तर कसं चालेल? तो नैसर्गिक न्याय होऊच शकत नाही असे राहुल नार्वेकर म्हणाले.