मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी नेमका अर्ज कसा भरावा? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तरुण या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करु शकणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तरुणांना राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. तसेच लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या वेतन म्हणून 6 ते 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. या योजनेसाठी नेमका अर्ज कसा भरावा? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तरुण या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज करु शकणार आहेत.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल. तिथे होम पेज उघडल्यानंतर New User Registration या बटनावर क्लिक करावं लागेल. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल. यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करावं लागेल. अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
महाराष्ट्रातील तरुण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन देखील अर्ज करु शकणार आहेत. सर्वात आधी तरुणांना महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे अर्ज डाऊनलोड करण्याच्या बटनवर क्लिक करावं लागेल. त्या अर्जाची प्रिंट काढावी लागेल. यानंतर तो अर्ज पूर्ण भरावा लागेल. तसेच तो अर्ज नेमका जमा कुणाकडे करावा याबाबतही माहिती दिलेली असेल. त्यानुसार तो अर्ज संबंधित ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागेल.
कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार?
- मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे.
- सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुण देणार आहे. तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहेत.
- यातील 12 उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार रुपये मिळतील.
- आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये मिळतील.
- पदवीधर तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये पैसे सरकारकडून मिळणार आहेत.
- सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
या योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत?
- या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
- दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
- तरुणाचं शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं.
- संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल
- तरुणाचं बँक खातं आधारकार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधारकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक