बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ऑनलाईनचा फंडा, परीक्षेला कॉपी नाही केली तर माफी नाही
HSC Exam | 0 व 12 वी परीक्षा होईपर्यंत परीक्षा यंत्रणेतील सर्व घटकांवर विविध माध्यामांद्वारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अन् चुकीला माफी नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा, दि. 22 फेब्रुवारी 2024 | बारावीच्या परीक्षेला बुधवापासून राज्यात सुरुवात झाली. देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अन् चुकीला माफी नाही, असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिलाय. कॉपी रोखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन संनियंत्रणाचा अभिनव प्रयोग करण्यात येणार असल्याचे ही नरवाडे यांनी सांगितले.
झूम ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टिम
बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता 12 वी च्या 117 परीक्षाकेंद्रावर सुमारे 1350 वर्गखोल्यांमध्ये 33 हजार 757 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वच परीक्षा केंद्रावर व वर्गखोल्यामध्ये CCTV उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशावेळी झूम ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टिमची चाचपणी सुरु आहे. यामाध्यमातून परीक्षा वेळेत प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीतील घडामोडी पेपरच्या वेळेत सकाळी 10 .30 ते 2.30 या वेळेत रेकॉर्ड करण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष
जिल्हास्तरावर अथवा आवश्यकतेप्रमाणे तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येणार आहेत. या कक्षामध्ये परीक्षा काळातील लाईव्ह फीड मॉनिटर रेकॉर्ड केला जाणार आहे. भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेसाठी उचललेले हे पाऊल भविष्यात निर्णायक ठरेल , असा विश्वास सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केला.
तसेच इयत्ता 10 व 12 वी परीक्षा होईपर्यंत परीक्षा यंत्रणेतील सर्व घटकांवर विविध माध्यामांद्वारे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अन् चुकीला माफी नाही, असा सज्जड दम देखील देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भविष्यात आपल्या कार्यशैलीबाबतचा सूचक इशारा दिला आहे.
गोंदियात पहिल्याच पेपरला 392 विद्यार्थ्यांनी दांडी
गोंदिया जिल्ह्यातील एकूण 74 केंद्रांवरून बारावीचे 19 हजार 904 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला 392 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. 19 हजार 512 विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण विभागाने 15 भरारी पथके तयार केली आहेत.